मराठमोळा जगप्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन

परळच्या छोट्याश्या चाळीतून जगभरात प्रसिद्ध झालेला मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी भोईवाडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री अशा अनेक खिताबांवर आशिष साखरकरने नाव कोरलं आहे. त्याने चारवेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य पदक, आशिया रौप्य पदक, युरोपियन चॅम्पियनशिप जिंकले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आशिष साखरकर याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ”शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स सारख्या अनेक खिताबांवर नाव कोरत आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या मराठमोळ्या आशिष साखरकर ह्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”’ असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.