आजचे भारतीय नाटक

>> अभिराम भडकमकर

मराठी रंगभूमी ही ठरावीक चौकटीच्या बाहेर पडत नवी रंगमंच परिभाषा धुंडाळण्याचा प्रयत्न करत राहते हे आजवरचे वास्तव आहे, परंपरा आहे. आजची रंगभूमी ही याच परंपरेला धरून एका नव्या मंच परिभाषेच्या शोधामध्ये आहे हे दिसते आणि हे आश्वासक आहे.

‘भारतीय नाटक’ या विषयावर बोलत असताना 60 चे दशक हे हिंदुस्थानी रंगभूमीबद्दल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मोहन राकेश, बादल सरकार, गिरीश कर्नाड, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर अशा नाटककारांनी हे दशक गाजवले. या नाटककारांच्या वेगवेगळय़ा नाटकांनी जो एक प्रभाव टाकला त्याचे पडसाद पुढील अनेक दशके रंगभूमीवरती उमटत राहिले.

मराठी रंगभूमीवर नाटककारांची मोठी परंपरा आहे. प्रत्येक दशकात महत्त्वाचे नाटककार निर्माण झालेले दिसतात. इथल्या महाविद्यालयीन स्पर्धांपासून ते राज्य नाटय़ स्पर्धांपर्यंतच्या स्पर्धा या नाटककारांच्या सृजनतेला व्यासपीठ देणाऱया ठरल्या आहेत आणि म्हणूनच नाटककारांची नवी पिढी निर्माण होताना दिसते. तुलनेने बाहेरील राज्यात हे प्रमाण कमी आढळते. 60 च्या दशकानंतर एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ती 90 च्या दशकामध्ये. एनएसडी दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर अशा संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले अनेक प्रशिक्षित रंगकर्मी आणि विविध प्रकारच्या वर्कशॉप्समधून तयार झालेले प्रशिक्षित रंगकर्मी मुंबईकडे झेपावले. व्यावसायिक रंगभूमीवर काम करायला त्यांनी सुरुवात केली. तडजोडी न करता आपले नाटक लोकांना स्वीकारायला भाग पाडले. मी त्यावेळी म्हणत असे, “नाटकावर माझं पोट आहे, पण मी पोटासाठी नाटक लिहीत नाही’’ आणि रंगभूमीचा चेहरामोहरा बदलू लागला. प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीमधील अंतर मिटते आहे असे बोलले जाऊ लागले. नाटकांचे विषय बदलले, सादरीकरणाची व अभिनयाची पद्धत बदलली.

हे सहजपणे झाले याचे कारण त्याच्याही आधी मराठी रंगभूमीवर अशा पद्धतीचे प्रयोग होतच राहिले होते. विशेषत विजयाबाई मेहतांच्या नाटकांनी, पु. ल. देशपांडे, कानिटकर, तेंडुलकर, दळवी, अनिल बर्वे, प्र. ल. मयेकर यांच्या नाटकांनी मराठी प्रेक्षकाला काही वेगळे पाहण्याची सवय लावली होती. परंतु ते प्रयत्न अधूनमधून होत असत. आता ते जोरकसपणे झाले. साधारणत कलाकृती तीन पद्धतीने पाहिली जाऊ शकते. एक म्हणजे थिएटर फॉर फन म्हणजे हसवा थोडं, थोडंसं रडवा, थोडं लोकांच्या मनातलं रंगभूमीवरती मांडा, त्यांचा कॅथोर्सिस करा आणि परत पाठवा. (हेही महत्त्वाचं आहेच. जे आपल्याकडचा हिंदी सिनेमा अधिक प्रभावीपणे करतो).

दुसऱया पद्धतीची नाटकं ती की, जी आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक परिसराविषयी आपल्याला भान देतात, एक जागृती आणतात. त्याला समकालीन अथवा कंटेम्पररी विषयावरील नाटके असे म्हटले जाऊ शकते. आणि तिसरा प्रकार म्हणजे लेखक जग आणि जगणं या संदर्भातल्या चिरंतन प्रश्नांना हात घालू इच्छितो. म्हणजे मनुष्याचे अस्तित्व, त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन अशा एकूणच वैश्विक प्रश्नांना तो हात घालतो.

90 च्या दशकातली नाटकं ही अधिकतर पहिल्या आणि दुसऱया प्रकारात गणली जातील. त्या काळामध्ये सामाजिक प्रश्न मांडणं या गोष्टीला अधिक महत्त्व प्राप्त होऊन गेलं होतं. किंबहुना लेखकाची सामाजिक बांधिलकी त्याच्या लिखाणातून दिसली पाहिजे, लेखनात उतरली पाहिजे असा जोरकस आग्रह धरणारी मंडळी आजूबाजूला होती. या मंडळींना नाटक हे सामाजिक प्रश्नांची चर्चा करणारं व्यासपीठ आणि अनेकदा तर सामाजिक प्रश्न मांडणाऱया वैचारिक चळवळींचा माऊथ पीस होऊन जाणं फार महत्त्वाचं वाटत होतं.

ही खरं तर लघुदृष्टी होती आणि म्हणून 90 च्या दशकामध्ये मोहन राकेश यांनी औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर लिहूनही त्या घटनेतच न अडकता सतत असत्य आणि विरक्ती यामध्ये अडकलेल्या माणसाचा वेध घेतला. आषाढ का एक दिनमध्ये कला कलाकार आणि जीवन या संदर्भामधलं काही मोठं शोधण्याचा प्रयत्न केला. दळवींनी लैंगिक कुचंबणा व निसर्ग नियम या संदर्भामध्ये काही मांडायचा प्रयत्न केला. 90 च्या दशकातली नाटके ही दुसऱया वर्गात मोडत राहिली, परंतु तिसऱया प्रकारच्या नाटकांकडे फार कमी नाटके आपल्याला वळताना दिसली. माझ्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकात मी आस्तिकता आणि नास्तिकता या एका चिरंतन संकल्पनाबद्दल काही शोधायचा प्रयत्न केला. ‘देहभान’मध्ये नैसर्गिक प्रेरणा आणि सामाजिक धारणा या संदर्भात काही सापडतेय का याचा विचार केला.

परंतु हे मान्य करावंच लागेल की, सामाजिक प्रश्न आणि सामाजिक चळवळी या संदर्भामध्ये नाटकाने बोलत रहावे हा कलाबाह्य आणि नाटक बाह्य घटकांचा दोषा नाटकांना अधिक व्यापक होण्यापासून रोखत राहिला आणि आमच्या पिढीच्या अनेकांच्या ते लक्षातही आलं नाही. आताचा काळ हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. लेखनाच्या शैलीवर ओटीटीचा मोठा परिणाम होताना दिसतो आहे. शिवीगाळी म्हणजे वास्तववाद, अनावश्यक ठिकाणी व वेळीही सेक्सची भरमार म्हणजेच बोल्डनेस अशा चुकीच्या संकल्पनांमध्ये अडकण्यामागे याचा फार मोठा वाटा असू शकतो. लेखनाच्या शैलीवरती ओटीटीचा परिणाम असे म्हणत असताना लोकांचा अटेंशन स्पेन म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही अत्यंत कमी होत चालली आहे हे गृहीत धरून नाटकाची ही रचना होत आहे की काय, असं वाटू लागलं आहे. या सगळय़ाचा विचार केला तरीसुद्धा मराठी रंगभूमी ही ठरावीक चौकटीच्या बाहेर पडत नवी रंगमंच परिभाषा धुंडाळण्याचा प्रयत्न करत राहते हे आजवरचं वास्तव आहे, परंपरा आहे. आजची रंगभूमी ही याच परंपरेला धरून एका नव्या मंच परिभाषेच्या शोधामध्ये आहे हे दिसते आणि हे आश्वासक आहे.

z [email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)