लेख – भारतीय लोकजीवनाचा आदर्श

>> पार्थ बावस्कर

प्रभू श्रीराम… भारतीय लोकजीवनाचा आदर्श. राम हे अयोध्येचे फक्त युवराज नव्हते तर ते एक कर्तृत्ववान, बलवान आणि खलांचे निर्दालन करणारे, सनातन धर्मध्वजा मिरवणारे महापुरुष आहेत. त्यामुळेच अवघे भारतवर्ष त्यांच्या पाठीशी उभे राहिले. रामाच्या नेतृत्वात भारतवर्षाने पहिल्यांदाच सागर उल्लंघून परराष्ट्रावर यशस्वी आक्रमण केले. परराष्ट्र नीती कशी असावी, युद्धरचना कशी करावी याचा आदर्श रामायणाने आपल्यापुढे घालून दिला आहे, तो आजही आचरण्यासारखाच आहे.

चैत्र महिन्यातील नवमी म्हणजेच श्रीरामनवमी ही समस्त भारतवर्षासाठी आनंदाची, भक्तिभावाची असते. रामायण घडून इतकी वर्षे होऊन गेली, पण आजही रामायणातील सर्व प्रसंग आपल्या स्मरणात आहेत. विशेषतः आजही अनेकांच्या मनात कैकयीबद्दल राग असेल? रामायणात पुढे राम स्वतः कैकयीला क्षमा करतात, पण इतक्या प्रदीर्घ काळानंतरसुद्धा तुमचा-माझा, रामप्रेमींचा कैकयीवरचा राग कमी व्हायला तयार नाही. अशा वेळी मनात विचार येतो, आजही तिच्यावर इतका राग, तर तेव्हाची अयोध्या कैकयीवर किती रागावली असेल, किती रुसली असेल, किती चिडली असेल? आणि अशा वेळी श्रीरामांनी लोकमताचा कौल घेतला असता तर 100 टक्के निकाल त्यांच्या बाजूने लागून ते निवडून आले असते, ते राजे होऊ शकले असते. त्यानंतर कदाचित कैकयीला तुरुंगातसुद्धा पाठवू शकले असते, पण….पण इतक्या मोठय़ा प्रमाणात सहानुभूती आपल्या बाजूने असूनही राम कसे वागले? एका आदर्श राजपुत्राने वागावे तसे! प्रभू रामाला शोभेल असे! श्रीराम धर्माला अनुसरून वागले.

वाल्मीकी रामायणात बालपणाचे वर्णन फार नाही. 16 व्या वर्षीचा तरुण राम आपल्यापुढे वाल्मीकींनी मांडला आहे. असे का? दशरथाच्या राजसभेत विश्वामित्र आल्याचा प्रसंग आठवा. अरण्यातील राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणत असताना त्यांचा नायनाट करण्यासाठी विश्वामित्र मुनी दशरथ राजाकडे मागणी करतात ती युवराज रामाची, वृद्ध दशरथाची नव्हे! ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोचि सर्वथा’ असे होते विश्वमित्रांचे उद्गार! दशरथासारखा अजिंक्य राजपुरुष स्वतः सिद्ध असताना विश्वमित्रांना हवे आहेत राम-लक्ष्मण! दोन कोवळे तरुण! या पोरसवदा तरुणांना सोबत घेऊन विश्वमित्र जातात आणि त्यांच्या हातून राक्षसवधाचे कार्य पार पाडतात, त्यांना ज्ञानदान करतात, राष्ट्राच्या वर्तमान स्थितीची ‘याचि देही याचि डोळा’ जाणीव करून देतात. याचाच अर्थ असा आहे, राष्ट्रात संजीवक बदल घडवायचे असतील तर त्यासाठी हाती धरायचा असतो युवक ! युवा पिढीवर करायचे असतात संस्कार. बलवान युवक तयार झाला की, राष्ट्र समृद्ध होते. प्रभू श्रीराम युवकांचे आदर्श असावेत आणि राष्ट्र घडावे म्हणून रामायण वाचायला हवेच!

राम वनवासात आले याचा आनंद ऋषीकुलाला झाला. श्रीरामांचा वनवास राक्षसांच्या क्षयाला आणि राष्ट्राच्या वृद्धीला कारण ठरेल असे त्यांचे मत. झालेही तसेच. रामांच्या हातून रावणवधाचे महत्कार्य याच वनवासात पार पडले. वनवासात श्रीराम ऋषींच्या सान्निध्यात राहिले. ऋषींनी आपल्या आश्रमात त्यांचे स्वागत केले आणि अनेकदा तर ऋषींनी त्यांना दिव्य आयुधे अर्पण केली. वनात असणाऱया राक्षसांची जाणीव त्यांना झाली आणि क्षत्रिय राजपुरुष म्हणून त्यांचा बीमोड करावा यासाठी राम सज्ज झाले. पुढे सीताहरणानंतर त्यांचा संबंध वनातील विविध नागर जमातींशी आला. अशा वेळी वर्णभेद दूर सारून श्रीरामांनी सैन्यरचना केली, वानर समूह एकत्र केला. एका क्षत्रिय राजपुरुषाच्या सैन्यात लक्ष्मण सोडला तर अयोध्येचा एकही सैनिक नव्हता. राम तर अयोध्येचे आहेत. आपण त्यांच्यासाठी का लढावे? असा प्रश्न दक्षिण भारतातील ना त्या वानरांना पडला, ना तेथील राजांना.

सेतुबंधन सुरू आहे, वानर सेना प्रयत्न करतेय, पण काही केल्या इतके मोठाले दगड पाण्यावर तरंगेनात. अशा वेळी त्या पाषाणांवर ‘राम’ ही अक्षरे कोरली जातात आणि चमत्कार बघा, त्या शिळा पाण्यावर तरंगू लागतात हो…कमालच नाही का! कानांना ऐकायला ही गोष्ट कितीही भावपूर्ण, भक्तिरसाने ओथंबलेली वाटत असली तर मला आपल्याला सांगू द्या! सेतुबंधनाचे हे अतिरंजित वर्णन वाल्मीकी रामायणात नाही. विज्ञान युगातील युवा पिढीला हे रामायण सांगायला गेलो तर त्यांचे हसणे स्वाभाविक नाही का! आहेच! अशांना उत्तर दिले आहे वाल्मीकींनी! त्यांच्या रामायणात मात्र सेतू बांधताना कितीतरी इंजिनीअर त्या ठिकाणी आपले बुद्धिकौशल्य वापरत होते. यंत्रांचा वापर होत होता, वाल्मीकींच्या रामायणात त्याप्रमाणे ‘यंत्रौ; परिवहन्ति च’ असा उल्लेख अगदी स्पष्ट आहे. तोफांच्या मदतीने डोंगर फोडावेत, मोठाले पाषाण उचलावेत, लाकूड फोडावे आणि जंगलातील वनस्पतीच्या मोठाल्या सालांनी हे बांधावे, अशा रीतीने शंभर योजने लांबीचा सेतू बांधला इतके गणिती वर्णन वाल्मीकी करतात, तेव्हा कोणत्याही शंकासुराला शरण येणे भाग पडते. वाल्मीकींची रामकथा चमत्काराची नाही, म्हणून ती पुनः पुन्हा वाचावी अशीच आहे.

नराचा प्रवास नारायणापावेतो कसा होत जातो याचा आदर्श रामकथेने घालून दिलाय. भूमीवरच्या सगळ्यात बलाढय़ रावणाला मारल्यानंतरचा हा प्रसंग बघा! प्रत्यक्ष देवसुद्धा ज्याला मारू शकणार नाहीत असा वर ज्या रावणाला होता त्याचा वध केलाय कुणी? अयोध्येच्या एका युवराजाने! प्राणिमात्र, दानव, राक्षस, इतकेच नव्हे तर देवसुद्धा मला पराजित नाही करू शकणार, असा वर मागितला होता लंकाधीशाने थेट शिवाकडे. त्या नीलकंठाने तो दिलाही. मात्र वरदान मागताना रावणाच्या स्मरणातून मानव सुटला. मानवाकडून माझा वध ? शक्यच नाही, अशा अहंकारात रावण राहिला. प्राणी, दानव, राक्षस आणि देव यांच्या यादीत मानवाचा उल्लेख केला कुठे त्याने? त्या अहंकारावर विजय मिळवला श्रीरामांनी. युद्धसमाप्तीनंतर आकाशातून साक्षात देव पुष्पवृष्टी करून प्रभू श्रीरामांची भलामण करू लागले. ते त्यांना म्हणू लागले, ‘रामा, आपण परब्रह्म नारायणस्वरूप भगवान आहात, साक्षात परमेश्वर आहात!’ श्री नम्रतेने देवांना म्हणाले, ‘मी भगवान नाही. आत्मानं मानुषं मन्ये रामं दशराथात्मजम्.’ ‘तुम्ही मला काहीही म्हणा, मी सामान्य माणूस आहे, दशरथांचा पुत्र आहे.’ इतका निःस्पृह, निर्मोही आहे राम, सदाचरणी आहे राम. राम पराक्रमी आहे, बंधुप्रेमी आहे, एकवचनी आहे. राम प्रेमळ आहे. म्हणूनच श्रीराम आपले वाटतात आपल्याला. सीता रावणाने पळवून नेल्यावर ते रडतात, दुःखी होतात. आपली बायको दूर गेल्यावर कोणत्या सत्पतीला वाईट वाटणार नाही! असे हे श्रीराम. कुणी म्हणेल, त्यांनी हे सगळं केलं कारण देव होते ते, पण स्वतः श्रीरामच सांगतात की, ‘मी देव नाही, मी आहे माणूस. एक धर्माचरणी माणूस. धर्माच्या नियमात राहून पराक्रम करायला निघालेला शूर पुरुष! गुणांचा आग्रह धरला तर तुम्हीही होऊ शकता माझ्यासारखे, गाजवू शकता पराक्रम आणि होऊ शकता राष्ट्राचे आदर्श, कुठल्याही युगात. त्यासाठी फक्त एक करा. माझ्या चरित्राचा अनुग्रह करा.’

(लेखक व्याख्याता, इतिहास अभ्यासक आहेत. )