खाऊच्या गोष्टी – गजक की बात है

>> रश्मी वारंग

थंडीचा महिना आणि तीळ यांचे नाते खास आहे. तिळातील स्निग्धता तिळाच्या पदार्थातून शरीरात झिरपते आणि थंडीला सहन करण्याची ऊब मिळून जाते. तिळाच्या विविध पदार्थांमध्ये तीळपापडी ऊर्फ तीळसाकरी ऊर्फ गजक यांचा दरारा मोठा आहे. याच पदार्थांची ही एकत्रित गोष्ट.

आपल्याकडे ‘तिल’ या संस्कृत नावाशी संबंधित या शब्दाचे रूप पुढे तैल (तेल) असे होताना दिसते. सुश्रुतसंहितेमध्ये दिलेल्या तेलांपैकी तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आणि विशेष मानले गेले आहे. तिळाचे हे महत्त्व लक्षात घेऊन तिळाची वडी, तिळाची पापडी, तिळाची रेवडी असे वैविध्य हिंदुस्थानातील विविध प्रांतांत जपले जाते. तिळाच्या औषधी गुणधर्मामुळे तीळ, गूळ व मध यांचे लाडू जखम भरून येण्यासाठी औषध म्हणून वापरत असा प्राचीन काळापासून उल्लेख होतो. याशिवाय सैन्यातील सैनिकांना पौष्टिक खुराक म्हणून तीळ, शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जात असाही संदर्भ आढळतो. त्यातूनच सुरुवातीला औषधी गुणधर्मासाठी वापरण्यात येणारे हे तीळ, गूळ, शेंगदाण्यांचे मिश्रण नंतर सामान्यजनांमध्येही चवीने खाल्ले जाऊ लागल्याचे दिसते.

या तीळपापडीप्रमाणेच हिंदुस्थानातील अनेक भागांत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गजक. थंडीच्या दिवसात या गजकला मोठी मागणी असते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमधल्या विशिष्ट प्रांतांत मिळणारा गजक लोकप्रिय आहे. मध्य प्रदेशातील मोरेना येथील गजक खाण्यासाठी लोक दूरवरून येतात. मंद आचेवर तीळ आणि गूळ एकत्र शिजवले जातात. तिळाचा कणन्कण सुटा होऊन तिळातील नैसर्गिक तेल गुळात मिसळते हे या गजकचे खास वैशिष्टय़. मात्र तीळ किती काळ शिजवले जाणार याचे प्रत्येक हलवायाचे आपले आपले गणित असते. मोरेना भाग एकेकाळी चंबळच्या डापूंसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र आज इथल्या गजकने खास ओळख निर्माण केली आहे.

गजक काही महिने टिकतो, त्यामुळे मोरेनातला गजक भरभरून घेऊन जाणारी मंडळीही आहेत. मोरेनाप्रमाणेच राजस्थानातील भरतपूरमधील कुटैमा गजकही देश-विदेशात प्रसिद्ध आहे. तोंडात ठेवता क्षणी विरघळणारा हा गजक दात नसलेली मंडळीही आवडीने चघळून खातात. कुटैमा गजक नावातच तो बनवण्याची पद्धत दडलेली आहे. इथे तीळ, गूळ एकत्र न शिजवता गुळाचा घट्ट पाक बनवला जातो. तो खुंटीवर लटकवण्याइतपत घट्ट असतो. हा पाक खुंटीला बांधून तो खेचून खेचून सरळ केला जातो. नंतर त्यात तीळ कुटून कुटून मिसळले जातात. कुटैमा गजक या प्रक्रियेमुळे खास ठरतो.
तीळपापडी, तीळसाकरी किंवा गजक पदार्थ कोणताही असो तिळातील तेल गुळाच्या पाकात मिसळून जो उबदारपणा निर्माण करते ते थंडीच्या कठोरपणाला सुसह्य करणारेच असते. तिळातील गरमीची ऊब आणि गुळाच्या चवीचा गोडवा ओठांवर नकळत दाद आणतो…‘वाह, गजक’ की बात भैया…