भाजप स्टार प्रचारक नगरमध्येच ठाण मांडून; भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केल्यामुळे मनधरणीची वेळ

महायुतीचे स्टार प्रचारक असलेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे गेल्या काही दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये मुलाच्या विजयासाठी तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक काही सोपी राहिलेली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची मनधरणी करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यामध्ये महायुतीने पहिल्या यादीमध्ये नगरची जागा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांना जाहीर केली. त्यातूनच नगर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पसरणार हे निश्चित होते. आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण यांना नगरमध्ये न बोलता त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी घेऊनच बोलण्याची वेळ आली म्हणजेच याचा अर्थ नगर मध्ये काही भाजपमध्ये आलबेल असल्याचे दिसत नाही.

याआधीच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात जे पाडापाडीचे राजकारण झाले, याला कारणीभूत राधाकृष्ण विखे यांचे पुत्र विखे हेच आहेत, असे लेखी पत्र भाजपाच्या माजी आमदारांनी दिले होते. त्यामुळे आमदारांची नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला नगरची जागा जिंकायची आहे. तसेच महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके उमेदवार असल्याने विखे यांची अडचण झाली आहे. तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी अद्याप प्रचाराला लागलेले नाहीत, त्यामुळे विखेविरोधातील नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आताही निवडणूक जिंकायची असा निर्धार केल्यामुळे त्यांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावलेली आहे. प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून नाराजी कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी बैठकांचा सपाटाच मंत्री विखे यांनी सुरू केलेला आहे .

कोणाला नगर शहरांमध्ये ठेवायचे कोणाला श्रीगोंदा ला पाठवायचे तर कोणाला इतर तालुक्यात पाठवायचे याचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे त्याचीच चर्चा सध्या भाजप वर्तुळामध्ये सुरू आहे. ही जागा जिंकायची आहे असे ते पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सांगत आहेत पण दुसरीकडे मात्र सुजय विखे यांच्यावर असलेली अनेकांची नाराजी कायम आहे. गेल्या काही दिवसापासून राधाकृष्ण विखे यांनी फक्त बैठकांचे सत्र घेत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केलेला आहे.मात्र, आता नगरची जागाही महाविकास आघाडीकडे जाणार हे जवळपास निश्चित होऊ लागल्यावर भाजपाची म्हणजेच विखेंची पायाखालची वाळू आता सरकू लागलेली आहे. त्यातच आता पदाधिकारी काम करायला तयार नाहीत त्यामुळे विखेंसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे. आता किरकोळ किरकोळ विषय घेऊन आरोप प्रत्यारोप करायचे असे उद्योग सध्या विखे यांच्याकडून केले जात आहेत. पक्षाने जाहीर केलेले स्टार प्रचारक राज्याचे महसूल मंत्री हे आपल्या पुत्राच्या विजयासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे विखेंना ही निवडणूक आता सोपे राहिलेली नाही हे सुद्धा यातून निश्चित झालेले आहे .त्यामुळेच आता त्यांना पक्षातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्याला मनधरणी करण्याची वेळ घेऊन ठेवलेली आहे अशी चर्चा भाजप वर्तुळामध्ये होत आहे.