मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात! संजय राऊत यांचा सणसणीत टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना मिंधे सरकार आणि भाजपलं पुन्हा एकदा लक्ष्य केलं.

शिवसेनेच्या हिंदुत्त्वाबद्दल बोलताना, ‘चूल जळली पाहिजे आणि हाताला काम मिळायला पाहिजे. हे आमचे हिंदुत्व आहे’, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना ‘उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, या देशाला मुसलमान असो, ख्रिश्चन असो सर्व धर्माच्या लोकांना घाबरवले जात आहे आणि हिंदू आणि अन्य जातीधर्मामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. याने देशाला धोका आहे, अशाने देश तुटेल. संपूर्ण देशातील मुसलमान आज आमच्यासोबत आहेत. खासकरून महाराष्ट्रातले बहुतेक मुसलमान, मुसलमान कार्यकर्ते, गरीब मुसलमान, सामान्य मुसलमान आमच्यासोबत येतात आणि म्हणताता आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही त्यासाठी तुमच्यासोबत आहोत कारण तुमचं जे हिंदुत्व आहे, ते आमच्या घरी चूल पेटवणारे हिंदुत्व आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व आहे ते आमचं घर जाळणारे हिंदुत्व आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे आता देशामध्ये घराघरामध्ये जाती धर्माच्या आधारावर नाही तर मानवतेच्या आधारावर घराघरात रोजगार मिळायला हवा. चूल जळली पाहिजे आणि हाताला काम मिळायला पाहिजे. हे आमचे हिंदुत्व आहे. रामाबरोबर लोकांचे कामही व्हायला हवे हे आमचे हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व आम्ही या देशात हिंदुस्थानचे पाकिस्तान किंवा इराण व्हायला देणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ह काढले आणि पक्षही हिरावून घेतला आणि दुसऱ्यांना दिले यावर संजय राऊत म्हणाले, ‘हे तर बरोबरच आहे ना. जो शिवसेनेसोबत निर्णय घेतला तोच राष्ट्रवादीलाही निर्णय दिला. दहा वीस लोकं तुटून जातात आणि ते पक्षाचे मालक बनतात, असा आरोप त्यांनी केला.

‘जसे इथून कोणी 10, 12 लोकं हत्यार घेऊन जातील दुसऱ्या देशात आणि तिथे आत घुसून तो देश आमचा असे बोलले तर तसे होईल का? असं होत नाही. पण निवडणूक आयोग, न्यायालय, गृहमंत्रालय सर्व त्या दिशेने काम करत आहेत की, भाजपव्यतिरिक्त आणखी कोणताही पक्ष या देशात राहायला नको. जे राहतील ते आमचे गुलाम बनून राहतील’, असा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी काल विधान केलं त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की दाढीवर हात फिरवला तर तुमची लंका जळेल. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सर्व. लंका ही रावणाची जळते हे त्यांना माहित नाही.रामाला दाढी नव्हती. दाढी रावणाला होती. त्याला रामायण वाचावे लागेल, महाभारत वाचावं लागेल. या महाराष्ट्राला कायम सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळालेले आहेत. यशवंत चव्हाणांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत परंपरा पाहिली तर सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. ते साहित्य, कला, काव्य यांच्यामध्ये रमायचे लेखक त्यांच्यासोबत असायचे. त्यामुळे कोणाचे काय जळतेय ते लवकरच कळेल ना. मुळात दिल्लीचीच लंका जळतेय. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलात ना ती लंकाच आम्ही जाळतो आहोत. तेव्हा तुमचे काय होणार? ही दाढी बिढीच्या गोष्टी आम्हाला सांगू नकात’, असा टोला त्यांनी लगावला.

बाळासाहेब चोरायला वस्तू आहेत का, असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलं. ‘विचार. विचार असे चोरुन मिळत नाही. चोरटे, भामटे यांचे राज्य आमच्यावर सुरू आहे आणि आम्ही लवकरच ते आम्ही नष्ट करू. ही डायलॉगबाजी आम्हाला सांगू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो आहोत आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात’, असं ते म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात आहे. ते दिल्लीतले तुमची दाढी हवी तेव्हा खेचून दिल्लीला बोलावतात. लंकेचे बोलू नका. कारण लंका तुमची आहे. तुम्ही सर्व रावण आहात. तुम्ही रामायण वाचा आधी. रावणाची लंका जळली होती आणि महाराष्ट्रामध्ये रामाचे पंचवटीमध्ये वास्तव्य होते. आधी रामायण वाचा आणि मग त्यावर बोला.

भाजपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सुधांशू त्रिवेधी यांना राज्यसभा दिली आहे. त्यावर बोलताना ‘आता तुमचे सध्याचे दाढीवाले मुख्यमंत्री आहेत. त्यांना विचारा यावर तुमचं काय मत आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली. यावर तर तुमचं काही मत आहे का? आता कोणाची लंका जाळणार आहात की तुमच्याच शेपटीला आग लावून घेताय? लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत. तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या. त्यांना सांगा जावून तो ऐकत असेलच आता. आज मी मुद्दामहून त्यांचा गुंडाबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना विश्रांती दिलेली आहे. थोडे घाबरले आहेत ते. अस्वस्थ आहेत त्यांना झोप येत नाहीय . कारण लवकरच माझ्याकडून असे काही फोटो येणार आहेत की अमित शहांनादेखील विचार करावा लागेल की काय माणूस नेमला आहे मी’, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.