Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडी 35 जागा जिंकणारच; जयंत पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. तसेच आरोप- प्रत्यारोपही होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीच्या बाजून जनमताचा कौल दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात राज्यात जनमत महाविकास आघाडीच्याच बाजूने असल्याचे दिसून आले आहे. तर सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसत आहे. राज्याच्या या सद्यपरिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जंयत पाटील यांनी महत्त्वाचा दावा केला आहे.

राज्यातील जनतेच्या मनामध्ये भाजपविरोधात संताप आहे. भाजपने जनतेची दिशाभूल केली असून दिलेली आश्वासने पाळली नाहीत. तसेच महागाईमुळे जनता त्रस्त आहे. आता लोकसभा निवडणुकीचीच जनता वाट बघत असून त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून लोकसभेला 32 ते 35 जागा मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे. एकास एक लढत झाल्यास भाजपला पराभूत करणे कठीण नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील राजकारणात अर्ज माघारीपर्यंत काहीही होऊ शकते, असे सांगत त्यांनी सांगलीच्या जागेबाबत संकेतही दिले. सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असे आमचे मत आहे. एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.