पेस्टल लेहंगा; लगीनसराईत नवा ट्रेंड

>> पूजा सामंत

लगीनसराईच्या मोसमातील खास पेहराव आणि त्याचे ट्रेंडस जाणून घेऊ या…
खरे म्हणजे नववधू तिच्या लग्नात काय पेहराव करते हे बऱयाचदा तिला किती फॅशनेबल कपडे वापरणे आवडते यावर अवलंबून असते. लेहंगा हल्लीच्या काळात नववधूच्या रिस्पेशनमध्ये सर्रास वापरला जातो. कधी नववधूच्या बहिणी, मैत्रिणी, वर-वधूचे पालक यांच्या इच्छेचा मान राखत नववधूला आपला पेहराव ठरवावा लागतो. अलीकडे विवाह सोहळय़ात वर-वधू यांच्या पेहरावातील रंगसंगती आवर्जून ध्यानात घेतली जाते. मराठमोळी वधू आणि तिच्या आई किंवा बहिणी, मैत्रिणी नऊवारी साडी नेसतात. नऊवारी साडीला मॅचिंग असा साजशृंगार केला जातो.

संध्याकाळच्या रिस्पेशनला मात्र मराठमोळी नववधू कधी पैठणी, कधी बनारसी शालू, तर कधी लेहंगा, कधी ग्लॅमरस फॅन्सी गाऊन अशा विविध पर्यायांचा विचार करताना दिसते. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे रिसेप्शनला पैठणी किंवा बनारसी शालू नेसण्याची परंपरा झपाटय़ाने कमी होत चालल्याचे दिसून येते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना कोचर यांनी लग्नसराईतील नव्या ट्रेंडविषयी माहिती दिली. त्या म्हणतात, उत्तर हिंदुस्थानातील बहुसंख्य नववधू विवाहासाठी सुर्ख (गडद) लाल, सिंदुरी लाल, कुमकुम लाल अशा रंगाच्या साडय़ा नेसतात. नववधूने लाल रंग ज्याला ते शादी का जोडा असे म्हणतात तो पेहराव केलाच पाहिजे अशी परंपरा-पद्धत आहे. कालानुरूप नववधू लेहंगा चोली असे ट्रेंडी पेहराव करू लागल्यात.

अलीकडे मात्र नववधूसाठी लेहंगा चोली हा ट्रेंड आहेच, पण नववधू त्यांच्या विवाह सोहळय़ातील रंगामध्ये लाल किंवा तत्सम गडद रंगसंगती न वापरता पेस्टल शेड्स (हलके-लाइट शेड्स) वापरण्याचा ट्रेंड वाढतोय. क्रीम, मोतिया, बेज, लाइट पिस्ता, सिल्व्हर अशा वैविध्यपूर्ण शेड्समध्ये लेहंगा, गाऊन वापरण्याचा ट्रेंड लग्नसराईत प्रामुख्याने आढळून येतो. त्यामुळे सात-आठ वर्षांपूर्वी नववधू, तिचे नातेवाईक, वराकडची मंडळी यांचे गडद रंगातील कपडे आता नजरेस पडत नाहीत.
पेस्टल शेड्सचा पेहराव लग्नकार्यात मोठय़ा प्रमाणावर दिसतो. हा ट्रेंड किमान पुढील चार-पाच वर्षे तरी कायम राहणार आहे.

– चित्रपट तारका, सेलिब्रिटीज त्यांच्या लग्नात कोणता पेहराव करतात, अलंकार, मेकअप कसा असतो याकडे पाहून तसे ट्रेंड ठरतात, फॅशनचे लोण तसे पसरते. पेस्टल शेड्समध्ये पेहराव कधीही ‘आऊट ऑफ फॅशन’ ठरत नाहीत. नववधूचा वर्ण गौर असो, श्यामल असो पेस्टल शेड्स कुणालाही चालतो. जॉर्जेटमध्ये असलेले लेहंगे वापरणे हादेखील एक प्रमुख ट्रेंड. फ्लोरल प्रिंटमध्ये असलेले गोटा पट्टीचे लेहंगा पेहरावाला मागणी आहे.

– मोठा घेर असलेले स्कर्टस् आणि आखूड कुडतीदेखील विवाहात वापरता येतात. बनारसी सिल्क लेहंगा, मिरर वर्क, रफेल लेहंगा, थ्री डी एम्ब्लिशमेंट, सिल्हर सिकेवेन्स वर्क त्यावर ऑक्सिडाइझ्ड मेटल ज्वेलरी, डिजिटल प्रिंट्सचे सिल्क गाऊन, क्लच बॅग्जस त्यावर मोटिफ्स, बॅग्जसवर प्रिंटेड सुवचने यांची खूप चलती आहे.

– यापैकी काहीही तुम्ही नव्याने शॉपिंग केले नसेल, पण जुन्या रंगीत शालूचा गाऊन किंवा लेहंगा चोली, कानांत लांब झुमके इतका लुक असला तरी तुम्ही ‘हट के’ दिसाल याची मी खात्री देते. लक्षात घ्या जुन्या सिल्क साडय़ा, शालू जर वापरात नसेल तर त्यातून लेहंगा-चोली हे पॅर्टन खूप वेगळे आणि शंभर जणींत उठून दिसेल हे नक्की! लेट्स ट्राय!