….महाजन यांना नेहमी मोठी खाती मिळतात; गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली मनातील खदखद

सध्या राज्यात ट्रिपल इंडिनचे सरकार आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांची गोची झाली आहे. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेल्या इचछुकांची मोठी निराशा झाली आहे. त्यातच आता मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून तिन्ही गटात जोरदार रस्सीखेच दिसत आहे. या सर्व घडामोडींमुळे तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असून ते मनातील खदखद व्यक्त करत आहेत. आता मिंधे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे. पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर स्वत: गिरीश महाजन उपस्थितीत असताना गुलाबराव पाटील यांनी ही फटकेबाजी केली. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत. तसेच ट्रिपल इंडिनच्या सरकारमध्ये सर्व आलबेल नसून अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत.

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील म्हणाले, मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचे मला काय देणे-घेणे नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन कारखाने आहेत. केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे, असे वक्तव्य पाटील यांनी महाजनासमोरच करत मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.