भाजप देशभरात द्वेष पसरवत आहे; राहुल गांधींचा मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

देशातून हजारो कोटी रुपये परदेशात जाताहेत

एका धर्माला दुसऱ्या धर्माशी, एका जातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावणे हे भाजपचे काम आहे. मणिपुरात भाजपने तेच केले. भाजप देशभरात हिंसाचार आणि द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील एका सभेत केला. छत्तीसगडमधील रायपूर येथे राजीव युवा मित्तान संमेलनामध्ये राहुल गांधी बोलत होते. विदेशातील काळा पैसा आणू असे सांगणाऱ्या मोदी यांनी काळा पैसा आणला नाही. उलट मोदी यांच्या जवळच्या अदानी यांनी हिंदुस्थानातील हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

रायपूर येथील सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी अदानीसंबंधी कोणताही तपास करणार नाहीत, हे मी दाव्याने सांगतो. कारण तपास केला तर नुकसान अदानीचे होणार नाही तर अन्य कोणाचे तरी होईल. भाजप आणि पंतप्रधान मोदी हे दोन-तीन अब्जावधींसाठी काम करीत आहेत. जगभरातील वृत्तपत्रांनी हे छापले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या अदानी यांनी हजारो कोटी रुपये हिंदुस्थानाबाहेर पाठवले आहेत. नंतर स्टॉक मार्केटमध्ये आपले शेअर्सचे भाव वाढवले. या पैशांतून त्यांनी आपली संपत्ती जमवली, असा आरोप राहुल यांनी केला. भाजप संपूर्ण हिंदुस्थानात द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. ज्या ठिकाणी भाजप द्वेष पसरवेल त्या ठिकाणी काँग्रेस प्रेम पसरवण्याचे काम करेल, असेही राहुल म्हणाले.

‘भारत जोडो’ यात्रेतून एकच संदेश होता. आपणा सर्वांना प्रेम आणि सन्मानाने राहायचे आहे. काँग्रेस सरकारने आदिवासींसाठी ‘पीईएसए’ कायदा आणला. यामुळे आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण झाले आहे. आदिवासीचा अर्थ हिंदुस्थानचे खरे मालक होय. तर भाजप आदिवासींना वनवासी म्हणते. त्यांना वाटते की, आदिवासींनी जंगलात राहायला हवे. बाहेर येऊ नये. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे, असे ते म्हणाले.