सामना अग्रलेख – मूर्ख बनविण्याचे दुकान

मोदी यांचा कारभार संविधानविरोधी आहे व पुन्हा ते महाराष्ट्रात येऊन नैतिकता व साधनशूचितेच्या गप्पा मारतात. हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे व मोदी यांनी हा धंदा जोरात चालवला आहे. जात प्रमाणपत्राचा घोटाळा करणाऱ्या नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळतो व अशाच प्रकरणात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली जाते. एक अपराध व दोन न्याय हे मोदी राज्यातच घडू शकते. त्यामुळे ‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले. हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे.

विरोधक जनतेला मूर्ख बनवताहेत, असे गमतीचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येऊन केले. शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदी यांची कधीच ख्याती नव्हती. त्यात आता निवडणुकांचा मोसम असल्याने मोदींच्या वक्तव्यांचा शिमगाच सुरू झाला आहे. मोदी सरकारने दहा वर्षे देशाला व जनतेला मूर्खच बनवले याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, पण विरोधक जनतेला मूर्ख बनवत असल्याचा फटाका मोदी यांनी फोडला. मोदी प्रचारासाठी तामीळनाडूतील वेल्लोर आणि मेट्टूपालयम येथे गेले. तेथे त्यांनी काय सांगावे? ते म्हणाले, ‘‘मोदी सरकार देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत.’’ मोदी यांचे हे विधान ऐकल्यावर जनतेला नक्की मूर्ख कोण बनवत आहे त्याचा खुलासा होईल. देशभरातील सर्व भ्रष्टाचारी, व्यभिचारी मोदी यांनी भाजपात घेतले. त्यातल्या अनेक बडय़ा भ्रष्टाचाऱ्यांवर स्वतः मोदी यांनी प्रहार केले होते. भाजपात या सगळ्यांना प्रवेश देऊन मोदी यांनी त्या सगळ्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले आहे. अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीसांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात आहे व मोदी त्या सगळ्यांना अभय देत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना कोण वाचवत आहे हेदेखील उघड आहे. निवडणूक रोख्यांचा प्रकार हा सरळ वसुली व खंडणीखोरीचा प्रकार आहे. भाजपच्या खात्यात वसुली माध्यमातून दहा-पंधरा हजार कोटी रुपये जमा केले जातात व मोदी महाराष्ट्रात येऊन

रामाचे कीर्तन

करतात. हे मूर्ख बनविण्याचेच धंदे आहेत. मोदी म्हणतात, काँग्रेसने ‘एक देश, एका कायदा’ होऊ दिला नाही व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कारापासून अनेक वर्षे वंचित ठेवले. मोदी यांना भाकडकथा ऐकवण्याचा छंद जडला आहे. कश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटविण्याचा पराक्रम मोदी सरकारने केला व त्याबद्दल त्यांचे कौतुकच व्हायला हवे, पण 370 कलम हटवले तरी तेथे भारताचे संविधान खरोखर लागू झाले आहे काय? हा प्रश्नच आहे. कश्मीरात आजही सैनिकी राज्य आहे. पाच वर्षांपासून तेथे विधानसभेच्या निवडणुका नाहीत. मग 370 कलम हटवून काय केलेत? कश्मीरात लोकांना रोजगार नाही, सुरक्षा नाही. भारतीय संविधान लागू झाल्यावर नोकऱ्या उपलब्ध होतील, असे ‘मोदी वचन’ मोदी यांनी दिले होते त्याचे काय झाले? कश्मीरचाच भाग असलेल्या लडाखमध्ये चिनी सैन्य थेट आपल्या हद्दीत घुसले आहे, असे सोनम वांगचुक यांनी उघड केले. लडाखमध्ये अशांतता असून तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे व भारतीय संविधान कश्मीर खोऱ्यात खतऱ्यात आले आहे. हजारो कश्मिरी पंडित आजही निर्वासितांच्या छावण्यांत राहतात व 370 कलम हटवून भारतीय संविधान लागू केल्याचा फायदा पंडितांना होऊ शकलेला नाही. मग कोणत्या भारतीय संविधानाची भाषा मोदी प्रचार सभांतून करीत आहेत? मणिपुरातून भारतीय संविधान पूर्णपणे उखडले गेले आहे व संविधानाच्या रक्षणासाठी मणिपुरात जाण्याचे धैर्य मोदी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे संविधान मोदींच्या नावाने अश्रूच ढाळत असेल. डॉ. आंबेडकर यांना कोणत्याही पदव्यांची व किताबांची गरज नाही. त्यांचे

मोठेपण जगाने मान्य केले

आहेच. ‘भारतरत्न’ची मोदी काळात इतकी अप्रतिष्ठा केली आहे की, आज डॉ. आंबेडकर असते तर त्यांनी ‘भारतरत्न’चे भेंडोळे मोदींच्या तोंडावरच फेकले असते. एखाद्या जातीची व पंथाची मते मिळावीत म्हणून मोदी सरकारने ‘भारतरत्न’ची खिरापत वाटली आहे. मोदी यांनी अशा प्रकारे सर्वच पदव्या, पदे, संस्थांचे अवमूल्यन केले व त्या सगळ्याचे खापर हे साहेब विरोधकांवर फोडत आहेत. मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर या निवडणुका अखेरच्याच ठरतील. मोदी देशाचे संविधान खतम करतील व रशियातील पुतीनप्रमाणे राज्य करतील ही भीती आहे. मोदी यांच्या पक्षाकडे भ्रष्टाचारी, गुंडांच्या फौजा आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. त्या बळावर ते विरोधकांना सुळावर चढवतात हे आता स्पष्ट दिसते. जनतेचा पाठिंबा असलेल्या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना त्यांनी तुरुंगात डांबले; पण अजित पवार, हेमंत बिस्व सर्मा, हसन मुश्रीफ वगैरे भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात प्रवेश देऊन सत्तेवर बसवले. मोदी यांचा हा कारभार संविधानविरोधी आहे व पुन्हा ते महाराष्ट्रात येऊन नैतिकता व साधनशूचितेच्या गप्पा मारतात. हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे व मोदी यांनी हा धंदा जोरात चालवला आहे. जात प्रमाणपत्राचा घोटाळा करणाऱया नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळतो व अशाच प्रकरणात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली जाते. एक अपराध व दोन न्याय हे मोदी राज्यातच घडू शकते. त्यामुळे ‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी पंतप्रधानपदाचे अवमूल्यन केले. लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले. श्रीमंतांना श्रीमंत करून गरीबांना फक्त स्वप्नेच दाखवली. हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे.