सामना अग्रलेख – ऐक्याची गुढी महाविजयाचे पाऊल!

मोदी यांच्याकडे पाशवी बहुमत होते व त्या बळावर त्यांनी देश लुटला. या देशाला पाशवी बहुमताच्या सरकारची गरज नाही. यापुढे सर्वमान्य मिलीजुली सरकार हेच देशाचे भाग्यविधाते ठरतील. महाविकास आघाडीने जी एकजूट दाखवली आहे, त्यातून 48 लोकसभा मतदारसंघांत एक ऊर्जा निर्माण होईल. भाजप व त्यांच्या बेइमान ‘मिंधे’ गटात जागावाटपात गोंधळ सुरू असताना ‘ठाकरे-पवार-पटोले’ एकत्र आले व त्यांनी 48 जागांचे वाटप घोषित केले. महाविकास आघाडीने महाविजयाचे पहिले पाऊल टाकले आहे!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीने ऐक्याची गुढी उभारली आहे. हा मास्टर स्ट्रोकच म्हणायला हवा. मतदारांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोजवारा उडवून राजकीय वातावरण शुद्ध करण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात व इंडिया आघाडीने देशात लोकांची ‘मन की बात’ मान्य करून या शुद्धीकरणात जनतेला साथ देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचे जागावाटप सुरळीत पार पडले. शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असे जागावाटप सर्वांनी मान्य केले व त्याबाबतची घोषणा एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली हे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीत बिघाडी वगैरे असल्याच्या अफवा आगलाव्यांकडून पसरविण्यात आल्या. त्यात काहीच तथ्य नव्हते. सर्वच पक्षांचे नेते ‘शिवालया’त एकत्र जमले व त्यांनी ऐक्याची गुढी उभारली. सामान्य माणसाच्या मनात जे होते तेच या नेत्यांनी समजूतदारपणा दाखवून केले. देशात एकाधिकारशाही, बनवाबनवी, हुकूमशाहीचा उच्छाद सुरू आहे. भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत पंतप्रधानपदावरून देशाचा कारभार हाकताना लोकशाही, संविधान, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली. मोदींसारखा नेता पुन्हा सत्तेवर आला तर देशातील ही अखेरची निवडणूक ठरेल अशी भीती जनतेला वाटत होतीच, पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतिराजांनीही हीच भीती व्यक्त केली आहे. देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही सुरू आहे ती पाहता हिटलरनेही मान खाली घातली असती. मोदी हे पंतप्रधान म्हणून सपशेल अपयशी व खोटारडे ठरले आहेत. महागाईपासून रोजगारापर्यंत त्यांनी दिलेली सर्व आश्वासने म्हणजे

थापेबाजी आणि जुमलेबाजीच

ठरली. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची त्यांची भाषा वल्गनाच ठरली व आज मोदी हेच सर्व भ्रष्टाचाऱयांना त्यांच्या तंबूत घेऊन देशात खंडणीचे सगळय़ात मोठे वसुली रॅकेट चालवत आहेत. भाजपच्या खात्यात भ्रष्टाचाराचा पैसा जमा होतोय, पण गोरगरीब जनता मात्र हवालदिल आहे. या जनतेला आधार आणि आत्मविश्वास देण्याचे काम आता महाविकास आघाडीला करावे लागेल. मोदी यांचा खोटारडेपणा जनतेला दाखवून द्यावा लागेल. मोदी काल चंद्रपुरात आले व प्रचार सभेत म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून त्यांच्या चरणाशी जोडे पुसायला बसलेल्या मिंधे यांची शिवसेना खरी व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी आहे. मोदी यांचे हे विधान म्हणजेच त्यांच्या मनातील निराशेचा उद्रेक आहे. शिवसेना फोडूनही उद्धव ठाकरे यांच्याच मागे महाराष्ट्र व मऱहाठी जनता आहे व आपण त्यांचा बालही बाका करू शकलो नाही हे नैराश्य त्यांच्या बोलण्यातून दिसते. मोदी यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी भय आहे. त्यांच्या बोलण्यातून ते भय दिसते. असली व नकली याचा फैसला महाराष्ट्राची जनता करेल. औरंगजेबाच्या मातीत जन्मलेल्या मोदी यांना हा अधिकार कोणी दिला? मोदी यांना महाराष्ट्र व मऱहाठी माणसाचा स्वाभिमान सूरतच्या बाजारात नेऊन विकायचा होता, पण उद्धव ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे त्यांच्या पोटातली खदखद आता बाहेर पडत आहे. महाराष्ट्रात मोदी यांची थापेबाजी चालणार नाही व मऱहाठी मुलखात त्यांच्या हाती आता काहीच लागणार नाही. त्यामुळे ते येथे येऊन हवे ते बोलतात. भाजप हा एक नंबरचा संस्कारशून्य पक्ष आहे. मोदी ज्या मंचावर होते त्याच मंचावरून चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यासंदर्भात

अत्यंत घाणेरडे भाष्य

करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला. मोदी यांच्यासमोर हे घडले, पण एरवी विरोधकांवर घसरणारे मोदी त्यांच्या उमेदवारांच्या बेताल बोलण्यावर गप्प बसले, जसे ते स्वपक्षाच्या निवडणूक रोखे भ्रष्टाचारावर तोंडास पट्टी बांधून गप्प बसले आहेत. मोदी व त्यांचे लोक देश बरबाद करीत आहेत व या बरबादीस रोखण्याचे कर्तव्य महाविकास आघाडीस पार पाडायचे आहे. देशात मोदींच्या जुमलेबाजीविरुद्ध वातावरण बनले आहे. मोदी यांचा करिश्मा वगैरे असल्याचे बोलले जाते ते खरे नाही. प्रचंड पैसा व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून ते स्वतःचा प्रचार करतात. त्यांनी भाडोत्री भगतगण निर्माण केले आहेत व त्यांच्या माध्यमातून ते मोदीनामाची भजने गाऊन घेतात. असे टाळकुटे त्यांनी सर्वत्रच निर्माण केले व हीच मोदींची ताकद आहे. देशात ‘इंडिया’ व राज्यात महाविकास आघाडीला या मोदी भजन मंडळाशी सामना करावा लागेल. महाराष्ट्रात ढोंग चालत नाही व मोदींचे महाराष्ट्रातील राज्य म्हणजे ढोंगच ढोंग आहे. सगळय़ा बेइमान लोकांना एकत्र करून मोदी महाराष्ट्रात राज्य करीत आहेत. हे भ्रष्टाचाराचे राज्य महाराष्ट्रात व दिल्लीत यापुढे टिकता कामा नये. मोदी यांच्याकडे पाशवी बहुमत होते व त्या बळावर त्यांनी देश लुटला. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी धर्म-माथेफिरू निर्माण केले. एका माथेफिरू माणसाची हुकूमशाही महान देश खड्डय़ात घालते याचा अनुभव देश घेत आहे. या देशाला पाशवी बहुमताच्या सरकारची गरज नाही. यापुढे सर्वमान्य मिलीजुली सरकार हेच देशाचे भाग्यविधाते ठरतील. महाविकास आघाडीने जी एकजूट दाखवली आहे, त्यातून 48 लोकसभा मतदारसंघांत एक ऊर्जा निर्माण होईल. भाजप व त्यांच्या बेइमान ‘मिंधे’ गटात जागावाटपात गोंधळ सुरू असताना ‘ठाकरे-पवार-पटोले’ एकत्र आले व त्यांनी 48 जागांचे वाटप घोषित केले. महाविकास आघाडीने महाविजयाचे पहिले पाऊल टाकले आहे!