धावत्या बसला लागली आग, वनकर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मध्य प्रदेशातील शहडोला येथे गोहपारु परिसरातील जंगलाजवळ एका धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते मात्र वनकर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना पटापट खाली उतरवण्यात आले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बस जळून खाक झाली. ही घटना बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष ट्रॅव्हलची बस रायपूर येथून इलाहाबादला जात होती. या बसमध्ये साधारण 50 प्रवासी बसलेले होते. दरम्यान बस गोपराहू परिसरातील जंगालाजवळ आली असताना अचानक बसचा मागचा टायर फुटला. टायर फुटताच बसला आग लागली. मात्र चालकाला आग लागल्याचे कळले नाही आणि तो बस पुढे घेऊन गेला. मात्र घटनास्थळी असलेल्या वनविभागाचे कर्मचारी रमेश कुशवाहा यांनी पेटती बस पाहिली त्यावेळी त्यांनी जोरजोरात आवाज दिला. मात्र चालकापर्यंत त्यांचा आवाज पोहोचला नाही. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते, त्यांनी तत्काळ आपली बाईक घेत बसचा पाठलाग केला. त्यांनी बसच्या साईड ग्लासमध्ये आपल्या बॅटरीची लाईट दाखवली. त्यानंतर बस चालकाने गाडी थांबविली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्याने बसला आग लागल्याची माहिती दिली. ज्यानंतर बसमधील सर्व प्रवाशी खाली उतरले.त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण करत अख्खी बस राख झाली. वनकर्मचारी रमेश यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचा जीव वाचला. बसला आग लागल्यानंतर लोकांनी या प्रकरणाची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र घटनेच्या दोन तासांनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बसला लागलेली आग स्थानिक लोकांनी विझवली तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.