बोरवडेत कालव्यावरील 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; मोठी दुर्घटना टळली

कोल्हापूर जिह्याची भाग्यदायिनी असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या कागल तालुक्यातील निढोरी शाखेच्या बोरवडे फाटा येथील उजव्या कालव्यावरील 30 वर्षे जुना असलेला वाहतूक पूल कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील हा पूल 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. याबाबत शेतकऱ्यांनी तोंडी व लेखी स्वरूपात मागणी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यानेच हा पूल रविवारी सकाळी ढासळला.

पूल कोसळण्याच्या जेमतेम पाच मिनिटे आधी पंधरा महिलांना घेऊन जाणारा एक ट्रक्टर या पुलावरून गेला होता, तर दुसरा रिकामा ट्रक्टर पलीकडे जात असताना पूल कोसळल्याने तो कालव्यात कोसळला. गावकऱ्यांच्या मदतीने कालव्यात अडकलेला ट्रक्टर बाहेर काढण्यात आला. सुदैवाने महिलांनी भरलेला ट्रक्टर जात असताना पूल कोसळला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बोरवडेजवळील शेतीतून काळम्मावाडीचा उजवा कालवा गेला आहे. शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी येथे 30 वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला होता. या भागात परिसरातील शेकडो एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते. कालव्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाच्या शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून उसाची वाहतूक सुरू असते.

सिंचनावर कोणताही परिणाम नाही
कालव्याचा पूल कोसळल्यामुळे सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना पर्यायी बाजूच्या पुलाचा वापर करण्यास सांगणार आहोत. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर नवीन पूल उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे दूधगंगा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी सांगितले.

दोन वर्षांपासून पूल धोकादायक बनला होता
दोन वर्षांपासून या पुलाच्या पिलरचे दगड निखळून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी येथे नवीन पूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने या परिणती पूल पडण्यामध्ये झाली. आता या परिसरातील शेतकऱ्यांना मुदाळ तिट्टा येथील पुलावरून ये-जा करावी लागणार असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दुर्घटनास्थळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, बोरवडेचे उपसरपंच विनोद वारके, ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ चव्हाण, केदार फराकटे यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नवीन पूल तत्काळ उभारावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.