प्रासंगिक – कान्स चित्रपट महोत्सवात हिंदुस्थानची पताका

>> प्रिया भोसले

अनेक देशांत स्वतःच्या देशातील चित्रपटांसाठी अनेक महोत्सव होत असतात. जगभरातील चित्रपटांसाठी कान्स चित्रपट महोत्सव म्हणजे एक पर्वणीच. कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात अगदी एखाद्या चित्रपटाला साजेशी रंजक सत्यकथाच म्हणावी लागेल. धगधगत्या महायुद्धाची पाने चाळली तर कान्स महोत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व दिसून येईल. हिटलरचा मित्र मुसोलिनीने फॅसिस्ट विचारांच्या प्रसार आणि प्रचारासाठी इटलीमध्ये 1932 ला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू केला. जो व्हेनिस चित्रपट महोत्सव नावाने ओळखला गेला. मुसोलिनीचे आयोजक असताना पुरस्कारासाठीचे निकषसुद्धा फॅसिस्ट विचारसरणीला पूरक असणं स्वाभाविक होतं.. ठिणगी तेव्हा पडली जेव्हा फ्रासच्या शांतीचा संदेश देणाऱया चित्रपटाला डावलून एका युद्धपटाला पुरस्कार दिला गेला. हा पक्षपातीपणा बघून फ्रान्सने कान्स चित्रपट महोत्सवाचे बिगुल वाजवलं, पण फेस्ट सुरू होण्याआधी हिटलरने पोलंडवर हल्ला केला आणि महोत्सवाचा मुहूर्त चुकला. दुसऱया महायुद्धानंतर 1946 ला पुन्हा एकदा फ्रान्सने कान्स चित्रपट महोत्सवाचं स्वप्न सत्यात उतरवलं. 21 देशांच्या सहभागाने कान्स चित्रपट महोत्सवाची दणदणीत सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजतागायत कान्स चित्रपट महोत्सवाचे वलय वाढतच आहे.

जगभरातील उत्तम चित्रपट आणि माहितीपट पाहायला मिळावीत, त्यावर चर्चा व्हावी हा कान्स चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश. इथे प्रत्येक चित्रपट पुरस्कार मिळवण्याच्या उद्देशाने दाखवलं जातं नाही. काही चित्रपट स्पर्धेसाठी तर काही चित्रपटांचे फक्त प्रीमियर होतात. चित्रपटांसोबत रेड कार्पेटवर दरवर्षी नवनव्या भारतीय कलाकारांची भर होताना दिसते. त्यातील प्रत्येक कलाकाराचे चित्रपट दाखवले जात नाहीत किंवा ते ज्युरीही नसतात. तरीही त्यांची वर्णी लागायचं कारण हे की, कान्ससारख्या मोठय़ा महोत्सवाला लागणारीं आर्थिक मदत सौंदर्यप्रसाधने विकणाऱया ब्रँडकडून केली जाते. हे ब्रँड आपले ब्रँड ऍम्बेसेडर पाठवून सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करतात. या रेड कार्पेटवर उतरणाऱया सिनेतारकांच्या चित्रविचित्र वेशभूषेसाठी कान्स प्रसिद्ध आहे. त्याबाबतीत कान्सची कपडय़ांबाबतीत नियमावली ठरलेली आहे.. स्त्रियांनी इव्हनिंग गाऊनसोबत हाय हील्स, तर पुरुषांनी गडद किंवा काळ्या रंगाचा सूट घालणं अनिवार्य आहे, पण 2015 साली एका नियमामुळे महोत्सव चर्चेत आला. 2015 ला रेड कार्पेटवर आमंत्रित केल्या गेलेल्या एका चित्रपटातील मध्यमवयीन महिलांना काही शारीरिक व्याधी कारणास्तव फ्लॅट शूज घातल्यामुळे फेस्टमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि ज्युलिया रॉबर्टस्सारख्या अभिनेत्रींनी चक्क हाय हील्स काढून फोटोसाठी पोज देत अशा जाचक नियमांविरुद्ध आवाज उठवला. परिणामी जागतिक स्तरावर अनेक कामाच्या ठिकाणी हाय हील्स बाबतीतले नियम शिथील झाले.

ऐश्वर्यामुळे कान्स हिंदुस्थानात प्रकाशझोतात आला असला तरी कान्स आणि आपल्या देशाचे 1946 पासून संबंध वृद्धिंगत होत गेले. पहिल्याच वर्षी अतिशय मानाचा समजला जाणारा झ्aत्स अ’ध्R पुरस्कार चेतन आनंद दिग्दर्शित ‘नीचा नगर’ चित्रपटाला मिळाला. सर्वोच्च पुरस्कार मिळालेला पहिला आशियाई चित्रपट म्हणून नीचा नगरनंतर कान्समध्ये इतर विभागांत बिमल रॉय,सत्यजित रे, व्ही. शांताराम, राजबंस खन्ना, मृणाल सेन, मीरा नायर, शाजी एन. करुण,दीपा मेहता,मुरली नायर,मनीषा झा,गीतांजली राव,रितेश बात्रा,नीरज घायवन,शर्ली अब्राहम, अमित मधेशिया, मोधुरा पलीत,पायल कापडिया, अश्मिता गुहा,शौनक सेन यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडे महोत्सवाच्या रेड कार्पेटवर चित्रपट कलाकारांसोबत भारतातील अनेक इन्फ्लुएन्सर्सही दिसले. याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपट ताऱयांव्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला कान्समध्ये भाग घेता येतो. कुठेही प्रकाशित न झालेल्या कामाची कान्स ज्युरी सदस्यांनी दखल घेतल्यास, आवडल्यास कुठलेही शुल्क न भरता तुम्ही सहभागी होऊ शकता. उदाहरणार्थ बहुचर्चित नॅन्सी त्यागी…चित्रपट तारकांच्या ड्रेसेसची नक्कल हुबेहूब उतरवणारीं ही मुलगी आज कान्स गाजवत आहे. उत्तर प्रदेशातील एका छोटय़ा गावातली मुलगी सिनेमाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या कलागुणांच्या जिवावर कान्स महोत्सवात पोहोचणे… नव्या प्रतिभेला संधी देण्याचं कान्सचं धोरण अधोरेखित करतं.

भारतात कान्समध्ये दाखवल्या जाणाऱया चित्रपटांपेक्षा विचित्र कपडे घालून मिरवणाऱया कलाकारांवर चर्चा केली जाते, पण कान्स फक्त सिनेतारकांच्या फॅशनपुरतं मर्यादित नाही हे लक्षात घ्यायची गरज आहे..कान्सने जगभरातील उत्तमोत्तम चित्रपटांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि 1946 पासून अशा महोत्सवांमध्ये समांतर आणि व्यावसायिक चित्रपट स्पर्धेसाठी देण्यात भारताचा मोठा वाटा आहे. या वर्षीही पायल कापडिया यांचा ‘ऑल वी इमॅजिन एज लाईट’ चित्रपट स्पर्धेत आहे आणि नॅन्सी त्यागीसारखी छोटय़ा गावातली मुलगी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून फॅशनची नवीन दालनं उघडू पाहतेय. फिल्म आणि फॅशनचा हा संगम भविष्यात अनेक पायल आणि नॅन्सीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देईल यात शंका नाही.

[email protected]