समृध्दी महामार्गावर गर्डर बसवताना भीषण दुर्घटना, दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू

<< शाम धुमाळ >>

शहापूर तालुक्यात मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाचे अंतिम टप्याचे काम सुरू असतानाच गर्डर आणि तो ठेवण्यासाठी आणलेला लाँचर काम करणाऱ्या कामगारांवर कोसळला असून या भीषण दुर्घटनेत आतापर्यत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत 3 कामगार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. काल रात्री 11 वाजल्याच्या सुमारास गर्डर आणि गर्डर लाँचर दोन्ही कोसळले. दुर्घटना घडली तेव्हा कामाच्या ठिकाणी  17 कामगार आणि 9 इंजिनियर काम करत होते. गर्डर आणि गर्डर लाँचर कामगारांवर कोसळल्याने 17 जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन टीम ,समृद्धी कामगारानी मिळून क्रेनच्या साह्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले असून अजूनही 4 ते 4 कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही बचावकार्य सुरू असून पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यत 17 कामगारांचे मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले आहे.