दहिसरमध्ये राहणाऱया बांगलादेशी महिलांना अटक

कामाच्या निमित्ताने बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसून मग दहिसर येथे येऊन राहणाऱया दोघा बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट-12 ने पकडले. पुढील कारवाईकरिता दोघींनाही दहिसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट-12 मध्ये कार्यरत असलेले सपोनि रासकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली  की दोन संशयित परकीय महिला नागरिक दहिसर येथे वास्तव्यास आहेत. त्याप्रमाणे त्या संशयित महिलांचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर त्याचे  तांत्रिक विश्लेषण करून ते मोबाईल वापरणाऱया व्यक्तींचा शोध घेतला असता दोन बांगलादेशी महिला मिळून आल्या. त्यांच्याकडे सखोल तपास केल्यावर त्या कोणत्याही वैध प्रवास कागदपत्रांशिवाय अवैधरीत्या हिंदुस्थानात आल्याचे व गेल्या फेब्रुवारीपासून अनधिकृतरीत्या दहिसरमध्ये वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून त्यांचे विरुद्ध दहिसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. एक 29 वर्षांची तर दुसरी 20 वर्षांची असून एका मैत्रीच्या ओळखीने त्या मुंबईत कामाच्या शोधात आल्याचे समजते. दहिसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.