क्रिकेट सामन्यादरम्यान नो बॉलवरून वाद; खेळाडूचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. नोएडा एक्स्टेंशनमध्ये रविवारी क्रिकेट सामना सुरू होता. तेवढ्यात खेळता खेळता सामन्यादरम्यान दोन संघांमध्ये वाद झाला. या वादात तिघांनी मिळून एका 24 वर्षीय तरुणावर दगडानं हल्ला केला. त्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सुमित असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. नोएडामध्ये रविवारी क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यातील नो बॉलवरून सुमित आणि अन्य तीन जणांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. यानंतर या भांडणाच रुपांतर हाणामारीत झालं. तिघांनी सुमितवर दगडानं मारायला सुरुवात केली. सुमितने या तिघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला आणि याच घटनेतून सुमितचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात सर्व आरोपी मेरठचे रहिवाशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. अधिकारी म्हणाले की, मुख्य आरोपी आणि इतर दोघांविरुद्ध बिसरख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुमितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.