किरकोळ वादातून तरुणाची हत्या; भांडुपच्या कोकण नगर येथील घटना

किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना भांडुपच्या कोकण नगर परिसरात घडली. सूरज भालेराव असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. अनिकेत आंब्रे, स्वप्नील आंब्रे, विनय राऊत, गणेश कोलपाटे, मयूर कोटियन उर्फ दूध आणि नितेश परब उर्फ चिचो अशी त्यांची नावे आहेत. त्या सहा जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बुधवारी रात्री कोकण नगरच्या जनता फ्लोअर दुकानासमोर सूरज, कल्पेश, चेतन, आशीष, कल्पेश, हृतीक, संग्राम हे एका बाजूला तर दुसऱया बाजूला अटक आरोपी हे दारू पित बसले होते. तेव्हा अनिकेत, स्वप्नील, विनय, गणेश, चिचो याने त्यांना चिडवत असलेल्या रागातून भांडण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्वप्नील ने संग्रामच्या तोंडावर लोखंडी फायटरने आणि डोक्यावर बाटली मारून जखमी केले. तर विनीत, गणेश, मयूर, चिचोने कल्पेश, चेतन, आशीषला लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. अनिकेतने सूरजच्या मानेवर, डोक्यावर आणि पाठीवर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर ते सहा जण पळून गेले.

या घटनेची माहिती स्थानिकांनी भांडुप पोलिसांना दिली. काहीच वेळातच भांडुप पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमी सूरजला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. मारहाणीत जखमी झालेल्या कल्पेशने दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंद केला. दत्तात्रय खंडागळे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक ठाकूर, सहाय्यक निरीक्षक बागडे, उपनिरीक्षक अभिजित टेकवडे, डामरे, कासार, मानकर, पाटील याच्या पथकाने तपास सुरू केला. तपास सुरू करून अनिकेत, स्वप्नील, नितेश, विनयला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत कोटियनचे नाव समोर आले. तो वसई येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वसई येथून कोटियनला अटक केली. कोटियनला अटक केल्यावर पोलिसांनी गणेशला रात्री उशिरा अटक केली.