अधिकृत आधार केंद्रात बोगस कारभार

बँक खात्यासाठी आणि सिमकार्डसाठी आधारची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी अवैध ठरवली.

अधिकृत आधार केंद्र थाटून तेथे बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना नवीन आधार कार्ड तसेच जुन्या कार्डचे नूतनीकरण करून देण्याचा गोरखधंदा गोवंडीतल्या बैंगनवाडी येथे सुरू होता. सात महिन्यांपासून हे गैरकृत्य सुमडीत सुरू होते. अखेर याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट-6 च्या पथकाने तेथे छापा मारून आधार कार्ड बनविण्याचा बनावट कारभार बंद केला.

बैंगनवाडी परिसरात दोन अधिकृत आधार केंद्र आहेत. मात्र तेथे नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी तसेच जुन्या आधार कार्डावरील नाव व पत्ता इत्यादीमध्ये बदल करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला जात आहे. 1400 ते दोन हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून दिले जात असल्याची माहिती युनिट-6 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक प्रशांत पवार, हनुमंत ननावरे, सपोनि गावडे, उपनिरीक्षक मुठे व पथकाने त्या केंद्रांवर छापा टाकला.  त्यावेळी त्या केंद्रांत पोलिसांच्या हाती काही जन्मदाखले, प्रतिज्ञापत्र लागले. शिवाय लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटर, संगणक देखील हस्तगत केले. पोलिसांनी मेहफुस अहदम खान (38), रोहन खान (22) आणि अमन पांडे (25) या तिघांना बेडय़ा ठोकल्याचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.

आरोपींची लाखोंची कमाई

मेहफुस याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत आधार केंद्रांचे काम सुरू होते. या कालावधीत त्यांनी हजारो लोकांना नवीन आधार कार्ड बनवून दिले शिवाय काहींना त्यांचे आधार कार्ड अपडेट करून दिले. त्यातील अर्धेअधिक नवीन बनवून किंवा अपडेट करून दिलेल्या आधार कार्डांसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. दिवसाला 20ते 30 लोकांना आधार कार्ड बनवून द्यायचे. एका आधार कार्डासाठी हे भामटे चौदाशे ते दोन हजार इतकी रक्कम आकारायचे. सात महिन्यांच्या कालावधीत आरोपींनी 15 लाखांपर्यंत कमाई केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.