अंधार दूर करायचा असेल तर, मनातली आणि EVM वरची मशाल पेटवा; मावळमध्ये आदित्य ठाकरे यांची झंझावाती सभा

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी झंझावाती प्रचार सभा झाली. या प्रचारसभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. या प्रचार सभेपूर्वी आदित्य ठाकरे खारघर-बेलपाडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून एक रोड शो काढण्यात आला. या रोड शोलाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिवर्तन आणण्यासाठी मशालीलाच मतदान करा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलं.

ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकापचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ह्यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी प्रचंड उपस्थित होती.

संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरात येत्या 4 जूनला आपण विजय मिरवणूक काढणारच. देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. जे काही रिपोर्ट आणि सर्व्हे येत आहेत. हे सर्व पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीत भाजप 400 काय 300 काय 200 ही पार करणार नाही. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेत येत आहे, असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

तुम्ही कोणाला मतदान करणार? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारताच उपस्थित नागरिकांमधून मशाल… मशाल… असा एकच आवाज उठला. देशात अंधार पसरत चालला आहे. इतर राज्यात राजकीय गोंधळ आणि अस्थिरता निर्माण केली जात आहे. हा अंधार दूर करायचा असेल तर मनातली आणि ईव्हीएमवरची मशाल पेटवणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजपप्रणित खोके सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. त्या खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काही केल्याचं तुम्ही ऐकलंय कधी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. वेदांता फॉक्सकॉन, मेडिकल पार्क, बल्क ड्रग पार्क, एअर बस टाका प्रकल्प, अपारंपरिक उर्जा प्रकल्प हे सर्व त्यांनी उचलून गुजरातला पाठवले. जून 2022 मध्ये वेदांता फॉक्सकॉनचा भव्य प्रकल्प महाराष्ट्रात मावळच्या तळेगावमध्ये येणार होता. वेदांता फॉक्सकॉनमुळे साधारणपणे एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळाला असता. वेदांता फॉक्सकॉन सोबतच 160 क्लस्टर उद्योग हे आजूबाजूच्या परिसरातच आले असते. पण ज्या मिनिटाला सरकार बदललं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वेदांता फॉक्सकॉनची बैठक झाली. त्या बैठकीनंतर तिसऱ्या दिवशी वेदांता फॉक्सकॉनने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. मी गुजरातच्या विरोधात नाही. पण महाराष्ट्रातील तरुणांची नोकरी, रोजगाराची संधी हातातून घेऊन गुजरातच्या घशात तुम्ही घालता तिथे मी भाजपला नडणार आणि लढणारच, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

ज्यावेळी भाजपला डोक्यावर बसवलं जातं, आपल्या महाराष्ट्राची स्वप्नं चिरडली जातात, तरुणांची स्वप्न चिरडली जातात. भाजपचा हा महाराष्ट्र द्वेष आता दिसू लागला आहे. वेदांता फॉक्सकॉन सोबत जे झालं ते टेस्ला प्रकल्पा बाबतही झालं. टेस्लाचा उद्योग आपण आपलं सरकार असताना आणणार होतो. तेव्हा केंद्र सरकारने गुंतवणूक दाखवा, असं सांगत हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ दिला नाही. आता हा टेस्लाचा उद्योग महाराष्ट्रात येणार असं ठरलं होतं. त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात पाठवणार की गुजरातला पाठवणार, हा साधा प्रश्न मी केला होता. भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघाचे उमेदवार पियुष गोयल यांनी देश म्हणून बघा, कदाचित इतर कुठे किंवा गुजरातला जाईल. आम्ही हमखास असं सांगू शकणार नाही, असं त्यावर त्यांनी सांगतिलं. हे महाराष्ट्रातले भाजपचे उमेदवार आहेत. आम्हाला आमचा टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात हावा आहे, हे मिंधेंनी दिल्लीत जाऊन सांगितलं असतं तर काय चुकलं असतं? गद्दारांना असं काही मागताना ऐकलं का? जे गद्दार खासदार आहेत त्यांना असं मागताना ऐकलंय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

इकडच्या खासदाराला आम्ही दहा वर्षे पाहिलंच नाही, असं अनेक लोक सांगतात. ह्या मावळच्या खासदारांनी जे घटनाबाह्य आहेत, गद्दार आहेत. वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून जात असताना आपण जसा मोर्चा काढला होता तळेगावात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्यावेळी त्यांनी काय केलं? माझा हट्ट हा इथल्या स्थानिकांसाठी भूमिपूत्रांसाठी, तरुणांसाठी आणि त्यांच्या रोजगारासाठी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.