तावडे बहिणींचे अनोखे रक्षाबंधन!   

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हिने आपल्या खास आठवणी शेयर केल्यात. ‘रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळय़ाचा राहिला आहे. कारण घरात नेहमीच खेळीमेळीचे वातावरण राहिले आहे. दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला, दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो. लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो, पण जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचे ठरवले.

या वर्षीचे रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे. कारण आम्ही दोघी बहिणी झी मराठीवरील दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहोत व ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी नवीन मालिका जी दोन बहिणींवर आधारित आहे व याच मालिकेच्या प्रोमोशननिमित्ताने आम्ही दोघींनी पूर्ण महिना साजरा केला आहे. एकमेकींना भेटवस्तू पण दिल्या आहेत. या वर्षी कितीही कामात व्यस्त असलो तरीही एकमेकींसाठी नक्की वेळ काढून भेटणार आहोत व हा दिवस साजरा करणार आहोत. प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी हा संदेश तर आम्ही आमच्या मालिकेतून देतच आहोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळय़ांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.’