अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे; एकनाथ खडसे यांचे आव्हान

जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हा लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत आव्हान दिले आहे. वरून आदेश आले आहेत, असे काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवले तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, राजकारण सोडून देऊ, असे आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. त्यावर, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना सवाल करत त्यांनाच पुन्हा आव्हान दिले आहे.

या घटनेबाबत अजित पवार म्हणाले की, मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरून आदेश आले आहेत, असे काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवले तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू. चला दुध का दूध पानी का पानी… आम्ही कोणी तिघांनी आदेश दिले असतील ना, तर सिद्ध करावे. आम्ही राजकारणातून बाजूला होऊ. अजित पवारांच्या या आव्हानाला उत्तर देत एकनाथ खडसेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री म्हणून काय विशेषाधिकार आहेत, याचा जीआर दाखवा, असे प्रतिआव्हानच अजित पवार यांना दिले आहेत.

अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. उपमुख्यमंत्री हे नामाभिधान असते, त्यांना कुठलाही विशेषाधिकार उपमुख्यमंत्री म्हणून नसतो. मग हे सांगताना मला विशेषाधिकार आहे, असा एखादा जीआर त्यांनी दाखवावा. एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज करत असताना एकनाथ खडसेंनी आदेश दिला म्हणून लाठीचार्ज होईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

तेथील एसपींनी सांगितले की, लाठीचार्ज करायच्या सूचना मला वरिष्ठांकडून मिळाल्या. मग हा वरिष्ठ कोण असू शकतो, त्यांच्यापेक्षा जो वरिष्ठ आहे तोच असू शकतो. एखादी घटना घडली तर त्याची अंतिमत: जबाबदारी ही गृह खात्यावर असते, गृहखात्याच्या मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेमंत्री राजीनामा, गोवारीचं हत्याकांड झालं तर मंत्र्याचा राजीनामा. मग, इथे लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही असे म्हणण योग्य नाही, ती त्यांचीच जबाबदारी आहे. दरम्यान, मी राजीनामा मागणार नाही. कारण, मी मागितल्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील, असे वाटत नाही, असा टोलाही खडसेंनी लगावला.