दोन तरुण संसदेत घुसले तेव्हा भाजप खासदार पळून गेले, त्यांची हवा निघालेली; राहुल गांधींचा हल्लाबोल

खासदारांच्या निलंबनाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. ‘विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची एकजुट आहे. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यातील आहे. द्वेषाच्या बाजारामध्ये आपण प्रेमाचे दुकान उघडत आहोत’, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रश्न फक्त संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटीचा नसून त्या तरुणांनी ही घुसखोरी का केली? हा देखील आहे. देशात बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीमुळे तरुणांनी रोजगार मिळत नाहीय. मी एकाला शहरात जाऊन सर्व्हे करायला सांगितला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. तरुण साडेसात तास फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटवर पडून असतो. मोदी सरकारच्या राज्यात हिंदुस्थानातील तरुण साडे सात तास फोनवर आहे, कारण सरकारने त्यांना रोजगार दिलेला नाही. संसदेत झालेल्या घुसखोरीमागेही बेरोजगारी हेच कारण आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी दोन-तीन तरुण संसदेमध्ये घुसल्याचे आपण सर्वांनी पाहिले. ते आत आले… धूर सोडला… यावेळी भाजप खासदार पळून गेले. जे स्वत:ला देशभक्त म्हणतात त्यांची हवा निघालेली, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

ते तरुण आत कसे आले? संसदेमध्ये गॅस सिलिंडर कसे आणले? त्यांनी हे आंदोलन का केले? त्यामागील कारण काय होते? तर बेरोजगारी… या देशातील तरुणांना रोजगार मिळत नाहीय. अमित शहांनी प्रश्न विचारला की, संसदेमध्ये दोन तरुण कसे घुसले? तर त्यांनी उत्तर देण्याऐवजी 150 खासदारांनी निलंबित केले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

खासदार लाखो मतं घेऊन निवडून येतात. त्यामुळे सरकारने 150 खासदारांचाच नाही, तर देशातील 60 टक्के लोकांचे तोंड बंद केले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.