युक्ती लढवून लहान बहिणीचा जीव वाचवणाऱ्या मुलीला आनंद महिंद्राकडून नोकरीची ऑफर

उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्वीटर म्हणजेच X वर सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट लोकांसाठी अनेकदा मार्गदर्शक ठरतात. त्याचबरोबर ते कायम नवनव्या कल्पनांचे कौतुक करत तरूणांना प्रोत्साहन देत असतात. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी अ‍ॅलेक्साच्या मदतीने स्वत:ला आणि लहान बहिणीला माकडाच्या हल्ल्यापासून जीव वाचवलेल्या मुलीला नोकरीची ऑफर दिली आहे.

उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणारी 13 वर्षीय मुलीने घरात शिरलेल्या माकडाला पळविण्यासाठी युक्तीचा वापर केला. या मुलीची 15 महिन्यांची लहान बहिण ज्या खोलीत होती त्याच खोलीत माकड शिरले होते. त्या माकडापासून आपल्या लहान बहिणीला वाचविण्यासाठी तिने अ‍ॅलेक्साला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढण्यास सांगितले. अ‍ॅलेक्साने ऑर्डर मिळताच लगेच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढण्यास सुरूवात केली, ज्यामुळे माकड घाबरले आणि पळून गेले.

यावर आनंद महिंद्रा यांनी ‘आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ की त्यावर प्रभुत्व मिळवू, हा या काळातील महत्वाचा प्रश्न आहे. मात्र या मुलीच्या कृत्यातून असे समजते की तंत्रज्ञान कायम मानवी कल्पकतेला सक्षम बनवत आले आहे. तिची द्रुत विचारसरणी विलक्षण होती. तिच्याजवळ या बेहिशोबी जगावर नेतृत्व करण्याचे सामर्थ्य आहे हे तिच्या कृत्यातून समजते. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिला कॉर्पोरेट जगतात काम करण्याची इच्छा असल्यास महिंद्राची दारे तिच्यासाठी कायम खुली असतील.’ असे ट्विट करत तिचे कौतुक केले आहे.