मंथन – क्रॉस ड्रेसिंग मनोविकार नव्हे!

>> अर्चना केळकर-देशमुख

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या अभिरुचीला, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य होतं आणि समाजात मानही होता. हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. क्रॉस ड्रेसिंग हा काही कोरोनासारखा प्राणघातक संसर्गजन्य रोग नाही, मनोविकार नाही, मानसिक विकृती नाही की काळपरत्वे येणारी एखादी फॅशन नाही. क्रॉस ड्रेसिंग हा मानवी मनाच्या आत्मिक आनंदाच्या तृप्तीचा मूलभूत मार्ग आणि हक्क आहे. आनंदाची अनुभूती मिळवण्याचा, आत्मिक समाधान मिळवण्याचा, आत्मबळ व विश्वास प्राप्त करण्याचा मार्ग आहे.

माझा ‘कैसे बताऊ!’ हा लघुपट क्रॉस ड्रेसिंग, बालकांचे यौन शोषण, वैवाहिक संबंधात पती-पत्नी, वृद्ध किंवा पाल्यावर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार या आणि अशा घटनांकडे जगभरातील सर्वसामान्य नागरिक सर्रास आपली पाठ फिरवून उभे राहतात याबाबत भाष्य करतो. नुकतेच या लघुपटाबाबतचे लिखाण प्रसिद्ध झाले. यानिमित्ताने पुन्हा एकदा लघुपटात मांडलेलं सारं प्रखरपणे प्रत्यक्षात अनुभवलं आणि या लघुपटाच्या लेखन-दिग्दर्शन-निर्मितीमागच्या उद्देशाला पुन्हा नव्याने धार आली.

लघुपटात जे मांडलेय ते वास्तव आहे यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, याला शहरी-ग्रामीण, सुशिक्षित-अडाणी, देशी-विदेशी असा कोणताही वर्ग अपवाद नाही. जगभरात बहुतांशी लोक आपल्या निपियतेचा पाठपुरावा करण्यासाठी स्वत:च्या कारणमीमांसेची ढाल शालीसारखी डोक्यावरून गुरफटून आतल्या अंधारात समाधानाने शांत बसतात. मनाला खात्रीने पटवून सांगतात की, आपल्या आजूबाजूला काही विपरीत घडतच नाही आहे. शेतकरी रात्री शेतात खाऊन पिऊन मचाणावर शांत चांदण्या बघत बसतो ना, अगदी तसंच! त्याला जसं एक समाधान असतं की, मी खूप मेहनत केली आहे आणि आता या डवरलेल्या शेतासाठी आपल्याकडून जेवढं करायचं होतं तेवढं आपण सगळं केलंय. आता जे काही आहे ते त्या आकाशातल्या देवाच्या मर्जीवर आणि कृपेवर अवलंबून आहे. ज्याचं त्याचं प्राक्तन ज्याने त्याने भोगावं. ताटात पडलं तर अन्न आणि सुकून गेलं तर कडबा.

अगदी तसंच सासरी मारहाण होणाऱया मुलीच्या, यौन शोषण झालेल्या मुलांच्या बाबतीत जन्मदाते आईवडील आणि शेजारीपाजारी करतात. कोणीही पुढे येऊन हा अत्याचार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करत नाही की ठोस पावलं उचलत नाहीत. प्रत्येकाची प्रत्येक वेळी कारणं ठरलेली असतात… पदरात मूल आहे… तिने समजून घेतलं पाहिजे…आया नोकऱया करायला लागल्या ना, त्याचीच ही फळं… पोरांनी एकटं जावंच का इथे तिथे… असे कपडे घालावेतच का… बघावंच का पुरुषांकडे… आपल्या मर्यादा ओळखाव्यात…त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे… नवरा -बायकोच्या भांडणात आपण कसं मध्ये पडणार! अशी माळ लागते नाकर्तेपणाच्या बहाण्यांची… आणि एका दुर्बल जिवावर होत असलेल्या अत्याचारांकडे ‘मी’… ‘मी’ म्हणणारे कर्तबगार, सुशिक्षित, शहरी, तरुण, वडीलधारे…सर्वच ‘ब्र’ ही न काढता राजरोसपणे पाठ फिरवून मोकळे होतात, पण हाच मूग गिळून गप्प बसणारा शेजार आणि समाज कोणी वेगळा वेश परिधान केला, केशरचना केली किंवा समलिंगी जोडीदार निवडला की, आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा ऱहास होईल म्हणून कधी सोज्वळ साळसूदपणाचा आव आणून प्रश्न विचारून, कधी खोचक बोलून, तर कधी दंड थोपटतच आपली नाराजी व्यक्त करतात. परदेशातही हाच कित्ता गिरवला जातो. दुर्दैवाने याला एकही देश अपवाद नाही.

आपल्याकडे हल्ली बाब कोणतीही असली तरी परदेशी संस्कृतीचा तरुण पिढीवर फाजील प्रभाव पडत आहे, असा पाढा पढला जातो आणि लोक सॅनेटायझरने हात धुऊन मोकळे होतात. बेसिनपर्यंत चालत जाऊन पाणी आणि साबण वापरणं जसं काहींना कष्टाचं भासतं तसं यांना कारणमीमांसेच्या खोलात जाणं वाटतं. नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात माझ्याकडे बहुतांश जणांनी हाच पाढा मला ऐकवला. त्यांचं ठाम म्हणणं होतं की, आपल्या संस्कृतीमध्ये क्रॉस ड्रेसिंग प्रकाराचा लवलेशही नाही. ही तरुण पिढी आपली संस्कृती भ्रष्ट करत आहे. याला वेळीच आळा घालायला पाहिजे, नाहीतर उद्या अराजकता माजेल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. त्यावर त्यांना थोडक्यात काही खुलासे दिले ते असे की, आपल्या संस्कृती इतकी वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक, सहिष्णु, ग्रंथपुराण, वेद, नानाविध विद्याकलांनी समृद्ध असलेली आणि त्याच तोडीची वैचारिक प्रगल्भता असलेली संस्कृती जगभरात कुठेही नाही. आपल्या संस्कृतीमध्ये वेदकाळापासून समाजाची रचना ही समाजाची स्वायत्तता टिकवण्याच्या हेतूने नियोजनपूर्ण पद्धतीने केली गेली होती. ज्यात व्यक्तीला अवगत असलेल्या कौशल्याचा तसेच मानवाच्या मनोव्यापाराचा सखोल अभ्यास करून प्रत्येक घटकाचे सामर्थ्य, कलागुण, कौशल्याला सरलतेने सामावूनच नव्हे, तर समरूप करून घेण्याची क्षमता होती आणि आहे. त्यामुळे मंदिरासारख्या पवित्र वास्तूमधील कोरीव कलाकृतींमध्ये समलिंगी जोडीदारांच्या कलाकृती आढळतात.

क्रॉस ड्रेसिंग हा काही आधुनिक जगात उत्पन्न झालेल्या कोरोनासारखा प्राणघातक संसर्गजन्य रोग नाही, मनोविकार नाही, मानसिक विकृती नाही की काळपरत्वे येणारी एखादी फॅशन नाही की सोशल मीडियावर फेमस झालेली ‘मायकल जॅक्सन’ यांच्या गाण्याची धून नाही. क्रॉस ड्रेसर्सनी आपल्या समाजात, राजकारणात, संस्कृतीत आणि कलाक्षेत्रात पूर्वापार अतिशय महत्त्वाची भूमिका वठवली असल्याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतात. क्रॉस ड्रेसिंग हा मानवी मनाच्या आत्मिक आनंदाच्या तृप्तीचा मूलभूत मार्ग आणि हक्क आहे. सर्वसामान्यत: आनंदाची अनुभूती मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विशिष्ट मार्ग अवलंबते. उदा. विशिष्ट केशरचना, वस्त्रांचा रंग, प्रिंट, चष्मा, गॉगल, टोपी, टाय, डिझाइन, टक्कल झाकायला विग इत्यादी. जे केल्यावर, घातल्यावर किंवा लावल्यावर व्यक्तीला आत्मिक समाधान मिळते आणि त्या व्यक्तीचे आत्मबळ / विश्वास वाढतो. व्यक्तीला आपण परिपूर्ण असल्याचे समाधान मिळते आणि तरच ती व्यक्ती आनंदी होते, राहते.

हे व्यक्तिस्वातंत्र्य, सुदृढ समाज आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे हे आपल्या वेदपुराणांची रचना करणाऱयांनी अभ्यासले होते. उदा. कलाक्षेत्रात- नाटकांतून स्त्री भूमिका वठवणारे, लोकनृत्यातील नाचे / देवीच्या भूमिकेत नृत्य करणारे, सांस्कृतिक परंपरा- भागाबाई – भविष्य वर्तविण्याचे काम, गोंधळी – देवाला गाऱहाणी घालणारे, राजकारणात – बहुरूपी गुप्तहेराची कामगिरी लीलया पेलायचे, महाभारतात – शिखंडी या पात्राचे प्रयोजनच श्रीकृष्णाने अर्जुनालाही धर्माचे रक्षण करण्यासाठी स्त्राr वेश धारण करायला भाग पाडणे हे होते. पुराणकथा – इंद्रदेव – वेळोवेळी स्त्राrरूप धारण करून असुरांशी गनिमी कावा करून स्वर्गातील आपली सत्ता वाचवतो आणि स्वर्गात शांती प्रस्थापित करतो. किन्नर- राणी व राजकन्या यांच्या रक्षा कवचामध्ये प्रमुख भूमिका बजावत असत. सैन्यामध्येही किन्नरांना विशेष स्थान होतं. सण आणि आनंददायी प्रसंगात किन्नरांचा विशेष सहभाग असे. गणिका- शहराच्या रचनेमध्ये समाज सुव्यवस्थेच्या दृष्टीने गणिकांचे महत्त्व जाणून गणिकांच्या वस्तीचे प्रयोजन केले जात होते.

केवळ क्रॉस ड्रेसर्सच नव्हे, तर किन्नर (तृतीयपंथी), गणिका (वेश्या) या सर्व घटकांचा अत्यंत चाणाक्ष पद्धतीने समाजरचनेत उपयोग करून महत्त्वाच्या कार्यभागासाठी त्यांचं योगदान निश्चित केलेले होते ही बाब अभिमानाने मिरवावी अशी आहे. हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या अभिरुचीला, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य होतं आणि समाजात मानही होता. आता हेच अभिरुची आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची धुरा आपल्या हातात आहे. ही बाब आपण प्रत्येकाने सणासुदीला पारंपरिक पोशाख आणि वाद्य वाजवून अभिमानाने संस्कृतीचा वारसा मिरवताना मनात कोरून घ्यायला हवी. कारण आपल्या संस्कृतीच्या ठेव्याचं, विचारांचं पालन करूनच संस्कृतीचं संवर्धन साध्य होईल आणि परिणामी देश प्रगती करू शकेल. संस्कृती स्त्राrच्या पाठीवरचं कुबड नाहीये, की ज्यामुळे तिने अनंत काळ श्री रामाच्या स्पर्शाची आस ठेवून त्याचं ओझं वाहावं. म्हणूनच याची जाण ठेवत प्रत्येकाने जबाबदारीने ठोस पावलं उचलली पाहिजेत.

[email protected]
(लेखिका दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि समुपदेशक आहेत.)