ठसा – प्राचार्य मदन धनकर

>> महेश उपदेव

चंद्रपूरचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार, संपादक, चतुरस्र व्यक्तिमत्त्व, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्राचा आधारवड, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ‘चंद्रपूर भूषण’ मदनराव धनकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने विदर्भातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

प्राचार्य धनकर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1935 मध्ये चंद्रपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूरमध्ये झाल्यानंतर ते नागपूरमध्ये माहिती कार्यालयात 1964 मध्ये माहिती सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्याच वेळी त्यांनी मॉरिस कॉलेजमधून एमएची पदवी घेतल्यावर त्यांना बुलढाणा येथे माहिती कार्यालयात बढती मिळाली. त्यानंतर ते चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सरदार पटेल महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच महाविद्यालयात ते प्राचार्य झाले. आयुष्यभर त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले. ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

जानेवारी 2012 मध्ये चंद्रपूर येथे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्राचार्य मदन धनकर यांनी यशस्वी करून दाखविले. या संमेलनासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. मात्र या संमेलनानंतरच त्यांची प्रकृती खालावली. त्यांना अर्धांगवायूचा तीव्र आघात झाला. तेव्हापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य धनकर यांनी शिक्षक ते मराठी विषयाचे प्राध्यापक, अहेरी येथील शंकरराव बेझलवार तथा चंद्रपुरातील सर्वात मोठय़ा सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य असा प्रवास केला. प्राचार्य धनकर यांनी आयुष्यभर माणसे जोडली. ‘हरिवंश’ साप्ताहिक सुरू करून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले. 1997 मध्ये विदर्भातील 101 व्यक्तिमत्त्वांवर विशेषांक प्रकाशित केला. त्यानंतर विदर्भातील मान्यवर महिलांच्या कार्याची माहिती देणारा विशेषांकदेखील त्यांनी प्रकाशित केला. ‘हरिवंश प्रकाशन’ संस्था सुरू करून विदर्भातील नवलेखकांची पुस्तके प्रकाशित केली. अनेक नवीन लेखक, पत्रकार, सामाजिक, साहित्यिक, कवी यांना लिखाणासाठी प्रोत्साहित केले.

सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे माजी सचिव तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष होते. आघाडीची सांस्कृतिक संस्था ‘स्नेहांकित’चे संस्थापक अध्यक्ष होते. ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. चंद्रपूर येथे 1979 साली झालेल्या 67 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातदेखील त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. चंद्रपुरात त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे संमेलनदेखील आयोजित केले. माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व. राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. त्यांच्या जाण्याने विदर्भातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.