विज्ञान-रंजन – … आणि ‘आकाशवाणी’ अवतरली

>> विनायक

स्कॉटिश  गणित आणि भौतिकी संशोधक जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांनी 1867 मध्ये त्यांचं विद्युत चुंबकीय लहरींचं प्रख्यात समीकरण मांडलं. इलेक्ट्रोमॅग्नॅटिक वेव्हजचं हे समीकरण खूप सोप्या भाषेत समजावणं सोपं नाही, परंतु सर्वसामान्यांना ‘अनाकलनीय’ वाटणाऱ्या सूत्रांचा आधार घेऊन त्यांना समजतील, वापरता येतील अशी यंत्रे तयार करता येतात. त्यात कलात्मकताही आणली जाते आणि विज्ञानाच्याच मदतीने तयार झालेल्या ज्या अनेक लोकोपयोगी आणि जनरंजनाच्या वस्तूंचं नंतर ‘मार्केटिंग’ होतं, त्यात एडिसन यांनी शोधलेला विजेचा बल्ब किंवा फोनोग्राम असतो. जगदीशचंद्र बोस यांनी संशोधित केलेल्या, पण मार्कोनी यांनी पाठपुरावा करून पेटंट मिळवलेल्या बिनतारी संदेशांचा समावेश असतो.

अशा ‘वायरलेस’ कम्युनिकेशन किंवा संपर्क उपकरणांचा विकास होत आता तर हातातले मोबाईल फोन आणि कृत्रिम उपग्रहांद्वारे संचालित संपर्क यंत्रणेने जग व्यापले आहे. पण 19 व्या शतकात टेलिफोन आला, विजेचा दिवा आला त्या प्रत्येक वेळी समाजाला सुखद धक्का बसला. 1825 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 1853 मध्ये मुंबईत पहिली रेल्वे गाडी पाहायला हजारो लोकांनी गर्दी केली. मुंबईत आमच्याकडे गावाकडून येणारी नातेवाईक मुलं घरावरून जाणाऱ्या विमानांकडे कुतूहलाने बघत आणि पुढच्या विमानाची प्रतीक्षा करत. बिनतारी रेडिओ लहरींनी असाच प्रभाव पुढच्या काळात गाजवला. आज जगातलं सर्वात मोठं रेडिओ प्रसारणाचं जाळं हिंदुस्थानात आहे आणि 99 टक्के लोकांपर्यंत ते पोहोचलंय. आकाशवाणीचे कार्यक्रम आता मोबाईल ऍपवरही येतात, पण ते रेडिओद्वारा ऐकणारी काही मंडळी आजही आहेत (मीही ऐकतो). 13 मे 1887 रोजी मार्कोनी यांनी पहिलं रेडिओ प्रसारण केलं आणि ते 1894-95च्या सुमारास सर्वांसाठी उपलब्ध होण्याच्या टप्प्यापर्यंत आलं. 1909 मध्ये त्याबद्दल मार्कोनी यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आधी नोंद केली असती तर कदाचित ते जगदीशचंद्र बोस यांना मिळू शकलं असतं.

रेडिओ लहरींच्या प्रसारणात हेन्रिच हटर्झ यांनीही विद्युत चुंबकीय लहरींच्या प्रसारणाचं सूत्र मांडल्यामुळे या रेडिओ प्रसारण लहरींना सुरुवातीच्या काळात ‘हर्टिझन लहरी’ असंच नाव होतं. नंतर ‘रेडिओ वेव्हज’ म्हटलं जाऊ लागलं. असेच प्रयोग ऑलिव्हर लॉज यांनीही केले होते.

रेडिओच्या ट्रान्समीटरवरून प्रसारित होणाऱ्या ध्वनीलहरी रिसिव्हरद्वारा ग्रहण करण्याचं तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यावर जगात अनेक ठिकाणी अशा प्रसारणाचा विचार सुरू झाला. हिंदुस्थानात 1923 मध्ये त्या वेळच्या ‘बॉम्बे रेडिओ क्लब’ने मर्यादित प्रमाणात रेडिओ प्रसारण केलं. ती मुंबईत घडलेली घटना म्हणजे देशातील रेडिओ युगाची नांदी होती. त्यापूर्वी 1890 मध्येच अमेरिकेत रेजिनल फेसेन्डेन यांनी ‘ऑल्टरनेटिव्ह’ (एसी) करंट वापरून रेडिओ प्रसारणाचे प्रयत्न सुरू केले आणि तुटक आवाज न येता सलग प्रसारण त्यांनी 1900 मध्ये सादर केले. साधारण एक किलोमीटर दूर असलेल्या लोकांना ते ऐकायला मिळालं. न दिसणाऱ्या माणसांचे आवाज रेडिओ किंवा टेलिफोनमधून ऐकू येऊ लागल्यावर घाबरणारे लोकही होते. टेलिफोन म्हणजे तर चेटूक आहे की काय, असाही संशय व्यक्त केला जायचा. अर्थात हे अज्ञान हळूहळू दूर झालं.

कालांतराने जगातल्या विविध देशांत रेडिओ प्रसारण पसरलं. 1916 मध्ये पहिल्या महायुद्धाचे पडघम वाजायला लागल्यावर लोकांना युद्धवार्ता सांगण्यासाठी ‘व्हाईस ऑफ अमेरिका’ प्रसारण सुरू झालं. 1919 मध्ये हे युद्ध संपताना बीबीसी या इंग्लंडमधील प्रसिद्ध ब्रॉडकास्टिंग कंपनीचा उदय झाला. हिंदुस्थानात मुंबईनंतर चेन्नई, कोलकाता इथेही खासगी रेडिओ प्रसारण होऊ लागलं. मैसूर संस्थानने पहिल्यांदा त्यासाठी ‘आकाशवाणी’ हा शब्द वापरला असं म्हणतात, परंतु ‘आकाशवाणी’ संकल्पनेबाबत मतांतर आहेत. 1927 मध्ये देशात रेडिओचे 3594 ग्राहक होते. त्यांना त्यासाठीच्या परवान्याची फी (लायसन्स फी) भरावी लागायची. आम्हीही ती सत्तरच्या दशकातही देत होतो. सरकारला त्यातून महसूल मिळायचा. 1928 मध्ये 6000 ग्राहक झाल्यावर रेडिओ प्रसारण इंग्रज सरकारने ताब्यात घेऊन 1 एप्रिल 1930 रोजी प्रसारण सुरू केलं, पण ते तोटय़ात गेल्याने 10 ऑक्टोबर 1931 रोजी बंद पडलं! त्यावर लोकांनी संताप व्यक्त करताच ते महिन्याभरातच सुरू करण्यात आलं. 1935 पासून फिल्डन आणि गायडर या अधिकाऱ्यांनी रेडिओ लोकप्रिय केला. तेव्हा त्याला ‘ऑल इंडिया रेडियो’ (एआयआर) म्हणत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात देशात नऊ रेडिओ स्टेशन्स होती. शिवाय संस्थानांची वेगळीच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशात एक लाख 40 हजार ग्राहक रेडिओला मिळाले होते. श्रोते त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक. 1950 मध्ये साडेपाच लाख ग्राहक झालेल्या रेडिओचं 1957 मध्ये ‘आकाशवाणी’ असं अधिकृत नामकरण झालं. 1947 च्या 11 नोव्हेंबरला गांधीजींनी जनतेला उद्देशून रेडिओवर पहिलं आणि शेवटचं भाषण केलं. रेडिओवरचे मनोरंजनाचे विविध कार्यक्रम 1936 पासून होतायत. सध्या 23 भाषांच्या 179 बोलीभाषांमध्ये तसेच जगातील काही भाषांमध्येही आकाशवाणीचे कार्यक्रम होतात. 27 ऑगस्ट 1920 रोजी ब्युनोस आयर्स इथे एका ऑपेराचं झालेलं प्रसारण 20 घरांत पोहोचलं तो पहिला ‘रेडिओ प्रोग्रॅम’ होता. आता बदलत्या काळातही रेडिओ ऐकला जातो. कारण ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे!