ठसा – 365 कथा @ 365 दिवस

>> प्रदीप मांजरेकर

व्यावसायिक  हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा कणा आहे. अशा व्यावसायिकांचा प्रवास अनेकदा आपल्याला अवगत नसतो. तसेच कलाकार – कलेचे उपासक हे समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीतले अविभाज्य घटक असतात. बरेच शासकीय अधिकारी जे सामाजिक शिस्त आणि व्यवस्था सुरळीत ठेवण्याची कामे करतात. अशा वर नमूद केलेल्या समाजातील विविध घटकांची माहिती आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल 365 दिवस 365 कथा, अर्थात ‘365 Days@ 365 Stories’ या मुलाखतींच्या शृंखलेच्या माध्यमातून रचना लचके-बागवे त्यांच्या YouTubeChannel ‘Rachna Lachke Bagwe’च्या माध्यमातून दररोज एक नवीन व्यक्तीची मुलाखत प्रकाशित करत आहेत.

‘365 Days@365Stories’ ही मुलाखतींची शृंखला जागतिक स्तरावरील पहिली अशी शृंखला आहे, जी 21 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झाली आहे. आजतागायत दररोज सकाळी 10 वाजता या मुलाखती प्रसिद्ध होतात. आतापर्यंत 235 हून अधिक मुलाखती सलग प्रसिद्ध झाल्या आहेत आणि 20 एप्रिल 2024 रोजी 365 मुलाखती प्रसिद्ध करून रचना लचके-बागवे नवीन विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहेत. आतापर्यंत मिलिंद लांजेवार – GST Commisioner, डॉ. रोहित साने – Madhavbaug, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे – संस्थापक अध्यक्ष- डिक्की, शंतनू भडकमकर- प्रसिद्ध उद्योजक, संतोष पाटील – हॉटेल व्यवसायिक, सुषमा कुलकर्णी – प्रकुलगुरू, निकमार विद्यापीठ, शुभांगी तिरोडकर- उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर, अनिता नारकर – समाजसेविका अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती या शृंखलेत घेण्यात आल्या आहेत. ज्यामुळे समाजाला एक प्रेरणा मिळत आहे. अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत. अनेकांच्या चांगल्या उपक्रमांचे दस्तऐवजीकरण होत आहे.