मोदींच्या गुजरातमध्येच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; नमाज अदा करण्यावरून विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे समोर आले आहे.  नमाज अदा करण्यावरून झालेल्या वादानंतर गुजरात विद्यापीठातील परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून हल्लेखोरांनी घोषणाबाजी आणि दगडफेकही केल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीत घुसून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, हल्लेखोरांनी  पोलिसांच्या डोळ्यांदेखत पळ काढला. 20 ते 25 अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या श्रीलंका आणि तझाकिस्तानच्या विद्यार्थ्याला सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडकिल सायन्सेस अँड रसिर्च हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणाचा व्हीडियो व्हायरल झाला असून   हल्लेखोरांच्या शोधासाठी नऊ पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी दिली.  हल्लेखोरांनी वसतिगृहातील खोलीत घुसून मोठय़ा प्रमाणावर तोडपह्डही केली. या घटनेनंतर गुजरात वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या वसतिगृहाचे गेट बंद ठेवण्यात आले आहे. गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात अफगाणिस्तान, उजबेकिस्तान श्रीलंका, भूतान, सीरिया आणि आफ्रिकन देशातील तब्बल 300 विद्यार्थी राहत आहेत. आम्ही हिंदुस्थानात शिक्षण घेण्यासाठी येतो. जर असेच हल्ले होणार असतील तर आम्हाला व्हिसा देऊ नका, अशा शब्दांत हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

नेमका कशावरून झाला वाद?

वसतिगृहाच्या खोलीत रमजान तारवीहनिमित्त नमाज पढत असताना हा हल्ला झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. जमावाने घोषणाबाजी आणि दगडफेक सुरू केली. रमजान महिन्यात, तारवीह नमाज ही विशेष प्रार्थना आहे. जी मुस्लिम समाजाकडून स्वेच्छेने केली जाते. ही प्रार्थना रात्रीच्या वेळी केली जाते, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

मारहाण आणि तोडफोड

विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीत घुसून  लॅपटॉप, एसी, कपाट, टेबल, दरवाजे, म्युझिक सिस्टम यांची तोडफोड करण्यात आल्याचे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. आम्ही हिंदुस्थानातील सर्व सणांमध्ये सहभाग घेतो. सर्वजण आमचे भाऊच आहेत, पण त्यांच्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

या घटनेनंतर गुजरात सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी तातडीची बैठक बोलावली. पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस आयुक्तांशी चर्चा करून वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल चर्चा केली.

हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. वसतिगृहातील ज्या ए ब्लॉकमध्ये हल्ला झाला तेथे 75 विद्यार्थी राहत असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नीरज गुप्ता यांनी वार्ताहरांना सांगितले.

व्हायरल व्हीडियोमध्ये काय?

व्हीडियोमध्ये भगवी शाल घातलेला एक व्यक्ती विद्यार्थ्यांना शिवीगाळ करताना आणि जय श्री रामच्या घोषणा देताना दिसत आहेत. वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु जमाव तोडफोड करताना दिसत आहेत.