भांडुपमधून 374 किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेची धडक कारवाई

मुंबईतील गंजेडींसाठी जळगावहून दोन गाडय़ांतून गांजा आणण्यात आला होता. पण भांडूप परिसरात ती वाहने येताच गुन्हे शाखेच्या युनीट-5च्या पथकाने गांजाची तस्करी पकडली. तब्बल 374 किलो वजनाचा व एक कोटी 12 लाख रुपये किमतींचा गांजाचा साठा पकडल्याने तस्करांना दणका बसला आहे.

भांडूप परिसरात दोन वाहनांतून गांजाचा साठा आणण्यात येणार असल्याची खबर युनीट-5ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक घनशाम नायर, निरीक्षक येरेकर, गोंधळी, सपोनि माळी, जाधव, खेडकर व पथकाने भांडूप येथील एरोली टोल नाका दिशेने जाणाऱया मार्गावर सापळा रचून ती दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली. त्या वाहनांची तपासणी केली असता त्यात मिळून 364 किलो गांजाचा साठा मिळून आला. या गांजाची तस्कर करणाऱया दोघांना पकडल्यानंतर चौकशीत त्याने जळगाव येथील हा गांजा मुंबईत आणल्याचा व तो गांजा देणाऱया एका व्यापाऱयाचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोपाळ नेटलेकर, शरद पाटील, सुनील मोहिते अशा तिघांना बेडय़ा ठोकल्या. आता हा गांजा ते कुठल्या ठिकाणी व कोणाला देणार होते याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे नशेडींची मोठी गोची झाली असून तस्करांनाही मोठा फटका बसला आहे.