भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार जिल्ह्यात, राहुल गांधी यांच्या आदिवासींसाठी पाच मोठ्या घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून तिचा पहिला थांबा नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार येथे दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांची सभा संपन्न झाली आहे. या सभेतून राहुल गांधी यांनी देशभरातील आदिवासींसाठी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आदिवासींचे जमीन आणि संबंधित घटकांवरील दावे निकाली काढून त्यांची जमीन त्यांच्या ताब्यात देऊ, जे दावे फेटाळले गेले आहेत, त्यांची फेरतपासणी करून ते सहा महिन्यांच्या आत निकाली काढू. काँग्रेस काळातील वनसंवर्धन आणि भूसंपादन कायदा जो भाजप सरकारने कमकुवत केला आहे, तो पुन्हा एकदा मजबूत करू. काँग्रेस सरकारमध्ये आदिवासींच्या अधिकारांचं संरक्षण केलं जाईल. त्यांच्या जमिनींना चौपट किंमत मिळेल अशी तरतूद करू. जल, जंगल आणि जमीन ही आदिवासींकडेच असेल, याची काळजी घेऊ अशा घोषणा राहुल गांधी यांनी केल्या आहेत.

त्याखेरीज, देशातल्या ज्या भागात आदिवासींची लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तो प्रदेश घटनेच्या सहाव्या परिशिष्टांतर्गत आणला जाईल. त्यामुळे तिथले सर्व स्थानिक निर्णय हे आदिवासींकडेच राहतील. इतर लोक त्यात ढवळाढवळ करू शकणार नाहीत, अशी महत्त्वाची घोषणाही राहुल गांधी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांची पिकवलेल्या धान्याच्या हमीभावाविषयी ज्याप्रमाणे कायदेशीर गॅरंटी देणार आहोत, त्याचप्रमाणे जंगलात उगवणाऱ्या आणि पिकवल्या जाणाऱ्या पिकांना व संबंधित उत्पादनांना हमीभाव मिळेल याची कायदेशीर गॅरंटी देऊ, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. आदिवासींना स्वतंत्र अधिकार, गावपातळीवर आदिवासींचं स्वायत्त सरकार असेल, अशीही घोषणा राहुल गांधी यांनी केली.