नाना पटोले यांच्या कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले; काँग्रेसला घातपाताचा संशय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी काँग्रेसने महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या कारला जोराची धडक दिली.  या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. सुदैवाने त्या कारमध्ये ते नव्हते. त्यावेळी ते दुसऱ्या कारमध्ये बसले होते. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेमध्ये नाना पटोले आणि कारमधील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षीत आहेत.

”ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला” – नाना पटोले

काल भंडाऱ्यात आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं, आम्ही तर सुखरूप आहोत पण गाडीचं पूर्ण नुकसान झालं, जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे मी आज सुखरूप आहे. हा घातपात आहे का याचा पोलीस तपास करतील – मा. नाना पटोले ( प्रदेशाध्यक्ष )

”भाजपला विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवायचे आहे का?” 

”यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात भाजपने घडवून आणल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला. त्याचवेळी नाना पटोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे”.