सांगलीत मध्यान्ह भोजन योजनेत 50 कोटींचा घोटाळा, पुरावे सादर करीत भाजप पदाधिकाऱयांचा पालकमंत्री खाडे यांना ‘घरचा आहेर’

फाईल फोटो

शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेत जिह्यात सुमारे 50 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या तक्रारीकडे कामगारमंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत केला. घोटाळ्याचे पुरावे सादर करीत पदाधिकाऱयांनी खाडे यांना ‘घरचा आहेर’ दिला.

भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश चिटणीस व कामगार आघाडीचे अमित कदम, आश्रफ वांकर यांच्यासह चार पदाधिकाऱयांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. कदम म्हणाले, ‘मध्यान्ह भोजन योजनेतील घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. कागदोपत्री पुरावे गोळा करून आम्ही या विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांना पाठविले आहेत. पालकमंत्र्यांनाही पुरावे सादर केले. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणास बसणार आहोत.’

जोपर्यंत जिह्यातील सहायक कामगार आयुक्तांवर घोटाळाप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार, असा इशारा भाजप पदाधिकाऱयांनी दिला आहे. या प्रकरणात सहभागी असलेली कंपनी, त्यांचे प्रतिनिधी, तसेच कामगारांच्या बोगस नोंदी करणाऱया सर्व घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.