मुंबई महापालिकेचे ‘मिशन झीरो कॅज्युअल्टी’! 40 प्राधिकरणांच्या समन्वयाने होणार काम

मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीत होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील विविध 40 हून अधिक प्राधिकरणांशी समन्वय साधून काम केले जाणार आहे. या कामासाठी प्रत्येक विभागात नोडल ऑफिसरच्या माध्यमातून समन्वय साधला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षीच्या पावसाळ्यासाठी पालिकेने ‘मिशन झीरो पॅज्युअल्टी’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात पालिकेच्या आपत्कालीन विभागात मुंबईतील सर्व प्राधिकरणांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, एनडीआरएफ, मेट्रो, एमएसआरडीसी, आयएमडी, नेव्ही, एअरपर्ह्स, राज्याचा आपत्कालीन विभाग, पोलीस, म्हाडा, एसआरए, बेस्टसह सर्व प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  मुंबईत अतिवृष्टीत दुर्घटना झाल्यास कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. यावेळी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

धोकादायक दरडींना सेफ्टी नेट

मुंबईत तब्बल 149 ठिकाणी दरडी, भिंती कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे या दुर्घटना टाळण्यासाठी दरडी सेफ्टी नेट लावून सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शिवाय या ठिकाणच्या रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था पालिका शाळांमध्ये न करता म्हाडा, एमएमआरडीएकडे असलेल्या ‘पीएपी’च्या (प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल) घरांची डागडुजी करून करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले.