एनएमएमटीच्या प्रवाशांनो सावधान! बसमध्ये मोबाईलवर जोरात गाणी लावाल तर थेट गुन्हा दाखल

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसमध्ये प्रवास करताना मोबाईलवर गाणे ऐकणे, मोठमोठ्याने बोलणे आता प्रवाशांच्या अंगलट येणार आहे. बस प्रवासात मोबाईलचा वापर करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बसेसमध्ये मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले असून जो मोबाईलचा वापर करेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे.

बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास एनएमएमटी प्रशासनाने मनाई केली आहे. सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या बसमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईलवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे सहप्रवाशांना त्याचा त्रास होतो. स्मार्टफोनच्या आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.

मोबाईलच्या आवाजाने बसमधील प्रवाशांमध्ये वादविवादाचे प्रकार होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशांवर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत (कलम ३८/१,२ व ११२) कारवाई होऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे. एनएमएमटी परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये इअरफोनशिवाय मोबाईलवर ऑडीओ/व्हिडीओ लावण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमातील सर्व चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारींमध्ये मोठी वाढ बसमधून प्रवास करताना काही प्रवासी मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणे ऐकतात. त्याचा इतर प्रवाशांना त्रास होतो. या संदर्भातील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. मोबाईलच्या आवाजावरून अनेक वेळा बसेसमध्ये वादविवादही झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बसेसमध्ये मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले आहे.