सापांनी फणा काढलाय, कधी डसतील ते सांगता येत नाही! खलिस्तानी समर्थकांवर कॅनडातील हिंदुस्थानी वंशाच्या खासदाराची टीका

कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांनी धुमाकूळ घातला आहे. या समर्थकांनी तिथल्या राजदूतांविरोधात पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये त्यांनी या राजदूतांना “खुनी” म्हटले आहे. या पोस्टरबाजीवर हिंदुस्थानी वंशाचे असलेले कॅनडातील खासदार चंद्र आर्या यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या अंगणात साप असून त्यांनी आता फणा काढला असल्याचं आर्य यांनी म्हटलं आहे. हे साप केव्हा डसतील हे सांगता येत नाही असं त्यांनी पुढे म्हटलं. आर्य हे मूळचे कर्नाटकचे असून ते कॅनडातील लिबरल पार्टीचे खासदार आहेत. आर्य यांनी कोणत्या व्यक्ती किंवा संघटनेचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा स्पष्ट रोख हा खलिस्तान समर्थकांकडेच होता.

खलिस्तान मुक्ती मोर्चाचे कॅनडात आयोजन करण्यात आल्याचा खलिस्तान समर्थकांनी दावा केला आहे. 8 जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खलिस्तान समर्थकांनी म्हटले आहे. या मोर्चाचे एक पोस्टर आर्य यांनी ट्विट केले असून यात त्यांनी म्हटलंय की खलिस्तान समर्थक द्वेश आणि हिंसाचार पसरवत आहेत. ज्यामुळे कॅनडातील लोकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे हनन होत आहे, खलिस्तान समर्थकांचे हे कृत्य लाजिरवाणे आहे. आर्य यांनी पुढे लिहिलं आहे की, “हिंदुस्थानच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करत त्या दिवसाबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. याची एकाही लोकप्रतिनिधीने निंदा केली नाही, ज्यामुळे त्यांची भीती चेपली गेली असून त्यांनी आता हिंदुस्थानी राजदूतांवर हिंसक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या अंगणात साप असून त्याने फणा काढला आहे. तो केव्हा डसेल याचा नेम नाही. “