छत्तीसगढमध्ये सीआरपीएफच्या तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान शहीद, 14 जखमी

छत्तीसगढच्या सुकमा – बीजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून 14 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्ल्याची सूचना मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा येथील टेकलगुडेम या सीमावर्ती भागात नक्षलवादी कारवायांवर प्रतिबंध करण्यासाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या मदतीसाठी येथे सुरक्षा तळ उभारण्यात आला होता. तळाशेजारीच सीआरपीएफचे जवान जोनागुडा-अलीगुडा परिसरात शोधमोहीम राबवत होते. या दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछुट गोळीबार सुरू केला.

याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सुरक्षा दलांचं प्रत्युत्तर पाहून नक्षलवादी पळून गेले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून 14 जवान जखमी झाले आहेत. त्यांना रायपूर येथे उपचारांसाठी पाठवण्यात आलं असून त्यांना जिवाचा धोका नसल्याची माहिती मिळत आहे.