पंतप्रधान मोदींच्या सभेला निघालेल्या बसला अपघात, भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू

छत्तीसगडमधल्या बेलतरा महामार्गावर एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी निघालेल्या बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं आहे.

रायपूर इथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जाण्यासाठी भाजप कार्यकर्ते बसमधून अंबिकापूर येथून निघाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हा अपघात इतका भीषण होता की बसचा बराचसा हिस्सा अक्षरश: फाटला होता. स्थानिकांच्या मदतीने बचाव पथकाने जखमींना बसमधून बाहेर काढलं. ड्रायव्हरला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी आज होणाऱ्या सभेच्या निमित्ताने एक ट्विट केले होते. “छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भाजपच्या जाहीर सभेसाठी मी उत्सुक असून छत्तीसगडच्या लोकांचे भाजपसोबत नेहेमी सौहार्दाचे नाते राहिले आहे. आमच्या पाठीशी असलेला आशिर्वाद कायम राहील असा मला विश्वास आहे” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पंतप्रधान मोदी हे छत्तीसगडमध्ये विकासकामांची उद्घाटने करण्यासाठी आणि नव्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी जाणार आहेत.