वंचितला सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न?

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील संभाव्य आघाडीबाबत चर्चा झाल्याचे कयास बांधण्यात येत आहेत.

यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही बैठकीच्या काही फेऱ्या पार पडल्या असून आपली युती पुढे कशी नेता येईल याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र काही कारणांमुळे तसे होऊ शकले नाही.

स्वत: काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याने वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश होण्याच्या शक्यता पुन्हा वाढल्या आहेत. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांशी काँग्रेसने 1998 साली युती केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून आलेच शिवाय त्यांच्या पक्षाचे 3 आमदारही त्यावेळी निवडून आले होते.