नगरसेवक निधीवरून स्थायी सभेत प्रशासन धारेवर

नगरसेवक निधीतील बिले निघत नसल्याने ठेकेदार विकासाची कामे करीत नाहीत. यावरून मनपा प्रशासनाला स्थायी समिती सभेत धारेवर धरण्यात आले. याबाबत पुढील सभेपर्यंत कार्यवाही न झाल्यास सभेत आंदोलन करणार, असा इशारा संपत बारस्कर यांनी दिला. सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेस सदस्य संपत बारस्कर, राहुल कांबळे, सुनील त्रिंबके, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, गौरी ननवरे, सुनीता कोतकर, कमल सप्रे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुऱहे, नगरसचिव एस. बी. तडवी, सचिन बांगर यांच्यासह अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

संपत बारस्कर म्हणाले, ‘नगरसेवक निधीतील कामांची बिले निघत नसल्याने ठेकेदार कामे करीत नाहीत. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या रोषास नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी लाख-लाख रुपये पगार घेत आहेत. मात्र, विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. येणाऱया सभेपूर्वी या संदर्भात निर्णय न घेतल्यास सभेत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. या विषयावरून सभापती कवडे यांनीही प्रशासनाला जाब विचारला. पावसाळा सुरू झाला तरी सावेडीतील रस्त्यांच्या पॅचिंगची कामे अजूनही सुरू केली नाहीत. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त केला. बोल्हेगाव येथील रस्त्याचे काम रखडल्याकडे बारस्कर यांनी लक्ष वेधले. शहरातील ओढे, नाले बुजवून त्यामध्ये पाईप टाकण्यात आले आहेत. ही अतिक्रमणे काढण्याबाबत प्रशासनाने कारवाई केली नसल्याने सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.’

कचरा संकलन ठेक्याला मंजुरी

शहरात सुरू असलेल्या कचरा संकलन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी व घंटागाडय़ांच्या वेळा, कर्मचाऱयांची हजेरी यावर नियंत्रण ठेवून 100 टक्के कचरा संकलन होऊन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेने तांत्रिक आधार घेतला आहे. सर्व घंटागाडय़ा, कॉम्पॅक्टरवर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवून मोबाईल ऍपद्वारे नियोजन केले जाणार आहे. हे काम नाशिक येथील मे. आयोटिक सोल्युशन्स या खासगी संस्थेला देण्यास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. शहरात सध्या श्रीजी एजन्सी या संस्थेमार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू आहे. महापालिकेच्या 45 व संस्थेच्या 20 अशा 65 गाडय़ा व 10 कॉम्पॅक्टरद्वारे कचरा संकलन केले जात आहे. आता ठेकेदार संस्थेने आणखी 35 गाडय़ांची खरेदी केली आहे. त्यामुळे कचरा संकलनासाठी शंभर गाडय़ा उपलब्ध होणार आहेत. नाशिकच्या मे. आयोटिक सोल्युशन्स या संस्थेची 34 लाख रुपये खर्चाची निविदा स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती. या निविदेला सभेत मंजुरी देण्यात आली आहे.