ठगाकडून पोलिसांनी वाचवले 39 लाख

कारवाईची भीती दाखवून एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाच्या बँक खात्यावर डल्ला मारू पाहणाऱया ठगांना सायबर पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 39 लाख 88 हजार रुपये गोठवले आहेत. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कुरीअर कंपनीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अशीच एक घटना नुकतीच घडली. अंधेरी येथे राहणारे तक्रारदार हे खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. नुकतेच त्यांना ठगाने पह्न केला. तुमच्या नावावर एक पार्सल आले आहे. त्या पार्सलमध्ये ड्रग, पासपोर्ट आणि काही रक्कम आढळून आली आहे. ड्रग असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत ठगाने तक्रारदार यांना घाबरवले.

तुमच्या विरोधात संबंधित यंत्रणा कारवाई करतील. जर गुन्हा दाखल झाल्यास अटक होऊ शकते अशी भीती घातली. त्यामुळे हे प्रकरण मिटवायचे असल्यास खात्यात रक्कम पाठवा असे त्यांना सांगितले. भीतीपोटी 39 लाख 88 हजार रुपये खात्यात पाठवले. त्यानंतर ठगाने त्यांना पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश भोर, मोहिते, पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. ज्या खात्यात पैसे गेले होते त्या खात्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अशी करतात फसवणूक

ठग हे कुरीअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. त्या पार्सलमध्ये ड्रग आणि पैसे असल्याचे सांगतात. त्यानंतर ठग हे पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पाठवतात. संबंधित तपास यंत्रणांचे बनावट लेटरहेड पाठवून कारवाईची भीती दाखवतात. त्यानंतर पैसे पाठवण्यास सांगतात. जर कोणी पैसे पाठवण्यास सांगत असल्यास पैसे पाठवू नये. फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा.