गटारात गुदमरून कामगारांचा मृत्यू; हायकोर्टाच्या दणक्यानंतर 25 लाख भरण्याची तयारी

गटारात गुदमरून मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱया कंत्राटदार कंपनीला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या कंपनीने 25 लाख रुपये प्रशासनाकडे जमा करण्याचे कबूल केले आहे. पॉलूकॉन इंजिनीअरिंग कंपनीकडे विरार येथील सफाईचे कंत्राट आहे. सफाईचे काम सुरू असताना कंपनीच्या चार कामगारांचा गटारात गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडितांच्या कुटुंबीयांना एकूण 1 कोटी 20 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. ही रक्कम न दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दिला. याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरसेन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.