गाडी दारातच उभी असताना फास्टटॅगमधून पैसे कापले; चंद्रपूरमधील घटना उघड

टोल वसूल करण्यासाठी फास्टटॅग प्रणाली कार्यरत आहे. मात्र, या प्रणालीतील अनेक त्रुटी उघडकीस येत आहे. गाडी घरासमोर उभी असतानाही फास्टटॅगमधून पैसे कापले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. फास्टटॅग लावलेल्या गाड्या टोलनाक्यावरुन बाहेर पडताना त्यातून आपोआप पैस कापले जातात. अशी फास्टॅगची यंत्रणा आहे. मात्र, मध्यप्रदेशच्या नर्मदापुरमध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या फास्टॅगमधून 175 किमी लांब असलेल्या टोलनाक्यावरुन टोल कापला गेला होता. आता अशीच घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे.

गाडी दारातच उभी असताना फास्टटॅगमधून पैसे कापले गेल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील व्यवसायीक जितेंद्र चोरडिया यांच्या वाहनाशी संबधित ही घटना घडली आहे. चोरडिया चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या इनोव्हा गाडी क्रमांक MH 34 AM 4410 साठी मालेगाव टोल नाक्यावरून फास्ट टॅग मधून 625 रुपये कापण्यात आल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यामुळे गाडी चोरीला गेल्याची शंका त्यांनी आली. मात्र, गाडी घरासमोरच उभी होती आणि फास्टटॅगचे स्टीकरही गाडीतच होते. तसेच याआधी ते कधीही मालेगावला गेले नाहीत. त्यामुळे गाडी घरासमोर उभी आहे. ज्या ठिकाणी आपण कधीही गेलो नाही, त्याठिकाणाहून टोल कसा कापला गेला, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

याआधी अशीच घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. नर्मदापुरममधील माखननगर रोडलगत राहणाऱ्या दयानंद पचौरी यांची गाडी त्यांच्या घराबाहेर उभी होती. 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर गाडीच्या फास्टटॅग मधून 40 रुपये टोल कापल्याचा मेसेज आला. हा टोल त्यांच्या घरापासून 175 किमी लांब असलेल्या टोलनाक्यावरुन कापण्यात आला होता. मेसेज पाहिल्यावर त्यांनी लगेचच नजीकच्या टोलनाक्याच्या टोल फ्री नंबरवर फोन करुन तक्रार नोंदवली. परंतु तक्रार केल्यानंतरही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.