Asian Games 2023 – अश्विनला कर्णधार करा 

जर फिरकीवीर वन डे संघाचा भाग नाही आणि बीसीसीआय आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी दुय्यम संघ पाठवत असेल तर त्या संघाचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनच्या खांद्यावर सोपवायला हवे, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी संघाचा अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने व्यक्त केले आहे.

येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी बीसीसीआय पुरुष आणि महिला संघांना पाठवणार आहे. यंदा वर्ल्ड कप आणि आशियाई स्पर्धा एकाच वेळी होणार आहेत. आशियाई स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी हिंदुस्थानी संघ वर्ल्ड कपचा सलामीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आशियाई स्पर्धेला दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाठविण्याची शक्यता आहे. तसेच या स्पर्धांसाठी संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे, पण कार्तिकने अश्विनला कर्णधार बनविण्याचा आग्रह केला आहे.

अश्विन हा आपल्या गोलंदाजीची गुणवत्ता आणि विकेटांच्या संख्येमुळे महान खेळाडूंच्या यादीत मोडला जातो. त्यामुळे तोच कर्णधारपदाचा खरा दावेदार आहे. किमान आशियाई स्पर्धांसाठी तरी त्याला कर्णधार करावे. हे त्याच्यासाठी एक संस्मरणीय बाब असेल, असेही कार्तिक म्हणाला.