अमुदान कंपनीच्या बॉयलरचा स्फोट, भयंकर स्फोटाने डोंबिवली हादरली; आठ ठार, 64 जखमी

डोंबिवली आज पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली. एमआयडीसी फेस-2मधील अमुदान केमिकल कंपनीत दुपारी बॉयलरचा भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 64 जण गंभीररीत्या जखमी झाले. कानठळय़ा बसवणाऱया स्फोटाने पाच किलोमीटरचा परिसर हादरला. धुराचे लोट आकाशाला भिडले तर आसपासच्या इमारतीतील घरे, दुकानांच्या काचांचा चक्काचूर झाला. या स्फोटाची झळ आजूबाजूच्या 11 कंपन्यांनाही बसली. निवासी भागातील 15 इमारतींना तडे गेले. रहिवासी जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुटले. या अग्नितांडवात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे बचाव कार्य सुरू होते. या दुर्घटनेमुळे 2016 रोजी याच एमआयडीसीत 12 कामगारांचे बळी घेणाऱया प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्या.

एमआयडीसीच्या फेस-२मध्ये अमुदान ही केमिकल कंपनी आहे. रुफिंग पत्र्यांसाठी लागणारे हार्डनर या कंपनीत बनवले जाते. फर्स्ट शिप सुरू असताना दुपारी दीड वाजता या कंपनीत प्रचंड स्फोट झाला. बॉयलर आणि रिअॅक्टर फुटल्याने उकळत्या केमिकलमध्ये कामगार अक्षरशः होरपळून निघाले. ज्वलनशील केमिकलमुळे आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण कंपनीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दुर्घटना घडली तेव्हा 50 हून अधिक कामगार कंपनीत काम करत होते. बाहेर पडण्यासाठी या सर्वांची जीवाच्या आंकाताने पळापळ सुरू झाली. काही कामगार सुखरूप बाहेर पडले. मात्र आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, अमुदान कंपनीसह शेजारील चावरे, मॉडेल इंडस्ट्रीज, पेमको, ओमेगा, कॉसमॉस, डेक्सन कंपनी, महाल प्रिंटिंग प्रेस, शक्ती एण्टरप्रायजेस, डेक्कन कलर, राज सन्स इंडस्ट्रीज, श्रीनिवास केमिकल्स या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले. या कंपन्यांतील कामगारही होरपळल्याने गंभीर जखमी झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ड्रम, पत्रे दोनशे फूट उडाले

स्फोट इतका भीषण होता की केमिकलचे ड्रम आणि कारखान्याच्या छताचे पत्रे दोनशे फुटांवर फेकले गेले. कंपनीच्या भिंतींना भगदाड पडून बाजूच्या कंपनींना आगीची झळ बसली. यामुळेही अनेक कामगार जखमी झाले. स्फोटानंतर पसरलेल्या केमिकलच्या वासामुळे आणि धुराच्या लोटामुळे तीन किलोमीटरपर्यंत दुर्गंधी पसरली. यामुळे नागरिकांचा जीव घुसमटला. या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.