Dombivli Boiler Blast : ओळख पटवणंही मुश्किल होतं, होरपळलेल्या मृतदेहाच्या हातातील अंगठी दिसताच पतीचा आक्रोश

डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-दोनमधील अमुदान केमिकल कंपनीत गुरूवारी झालेल्या बॉयलरच्या भयंकर स्फोटात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात एका महिलेचाही समावेश आहे. पत्नीचा मृतदेह दिसताच पतीने आक्रोश केला आहे. समोर दोन संपूर्णपणे होरपळलेले मृतदेह होते, त्यांची ओळख पटवणेही मुश्किल होते. पण तिच्या हातातल्या अंगठीवर नजर पडली आणि ती आपली पत्नी रिद्धीच असल्याने धक्का बसला.

अमित खानविलकर यांची पत्नी रिद्दी खानविलकर यांचा या स्फोटात होरपळून मृत्यू झाला. रिद्दी अमुदान केमिकल्समध्ये काम करत होती. तीन महिन्यांपूर्वी कंपनीतील लेखाविभागात तिला नोकरी लागली होती. स्फोट झाला त्यावेळी मी घरी होतो. स्फोट झाल्याचे कळताच मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन लागला नाही. शिवाय त्यांनतर ओळखितल्या काहींना फोन केला. पण काही संपर्क झाला नाही. मग तिलाच बघण्यासाठी घरातून निघणार तोवर समोरून एक फोन आला आणि शास्त्रीनगर रुग्णालयात बोलावण्यात आले. ते ऐकून पायाखालची जमीन सरकली. कसेबसे रुग्णालय गाठले. तिथे दोन महिलांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांची ओळख पटवणे खूप कठीण होते. मनात घालमेल सुरू असतानाच माझी नजर त्यातील एका महिलेच्या हातातल्या अंगठीवर गेली आणि ती माझी बायको रिद्धी होती. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. माझा बारा वर्षांचा मुलगा आहे, असे सांगत अमित खानविलकर यांनी टाहो फोडला.

या व्यतिरिक्त दुसऱ्या मृतदेहाची ओळख रोहिणी कदम अशी झाली आहे. रोहिणीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह ओळखला. मानपाडा येथील आजदे गावात रोहिणी आई-वडील आणि भावंडांसोबत राहत होती. कोणतीही चूक नताना रोहिणी आणि रिद्धीला जीव गमवावा लागला, असे रोहिणीच्या कुटुंबियांनी सांगितले.