पश्चिमरंग – पॅगनिनीचे कप्रिसस

>> दुष्यंत पाटील

निकोलो पॅगनिनी आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वात महान व्हायोलिन वादकांमध्ये त्याची गणना होते. तो जितका महान व्हायोलिन वादक होता, तितकाच महान संगीतकारही होता. पॅगनिनीने व्हायोलिन वादन एका वेगळ्या उंचीवर नेलं. दोनशे वर्षे होऊनही पॅगनिनीच्या 24 कप्रिससच्या संगीताची जादू कायम आहे.

तो व्हायोलिन वादक उंचीने जास्त असला तरी त्याचा बांधा अगदीच सडपातळ होता. त्याचा रंग अगदी निस्तेज वाटायचा. त्याचं व्हायोलिन वादन चालू असताना स्टेजवर मंद प्रकाश असायचा. त्याची बोटं एखाद्या कोष्टय़ाच्या पायांसारखी कृश, पण लांब होती. तो असं काही व्हायोलिन वादन करायचा की, श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. बऱयाचदा तो वाजवायला इतकं कठीण असणारं संगीत व्हायोलिनवर वाजवायचा की, श्रोत्यांचा विश्वासच बसायचा नाही. व्हायोलिनवर इतकं प्रभुत्व असलेलं लोकांनी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नव्हतं !

त्याचं व्हायोलिन वादन ऐकल्यावर हे ‘मानवी कृत्य’ नाही असंच श्रोत्यांना वाटायचं. स्टेजवरच्या मंद प्रकाशामुळे, त्याच्या उंच आणि सडपातळ शरीरयष्टीमुळे, लांब आणि कृश असणाऱया बोटांमुळे, वैयक्तिक आयुष्यावर न बोलण्याने त्याच्याभोवती एक गूढ वलय निर्माण झालं होतं. लोकांमध्ये अशा अफवा होत्या की, त्याने प्रत्यक्षात सैतानासोबत करार केलेला असून व्हायोलिनवरच्या अमानवी प्रभुत्वाच्या बदल्यात त्याने आपला आत्मा सैतानाला विकलाय. यावर त्याला कुणी प्रश्न विचारला तर तो उत्तर देणं टाळायचा. 1782 साली इटलीमध्ये जन्मलेल्या या व्हायोलिन वादकाचं नाव होतं निकोलो पॅगनिनी! आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वात महान व्हायोलिन वादकांमध्ये त्याची गणना होते. तो जितका महान व्हायोलिन वादक होता, तितकाच महान संगीतकारही होता. पॅगनिनीने व्हायोलिन वादन एका वेगळ्या उंचीवर नेलं. व्हायोलिन वादनाची नवनवीन तंत्रं त्याने शोधून काढली. पारंपरिक पद्धतीने व्हायोलिन वादन करताना जसा व्हायोलिन पकडला जायचा, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तो व्हायोलिन पकडायचा. काही वेळेला तर तो व्हायोलिनच्या एकाच तारेवर संगीत वाजवताना दिसायचा.

पॅगनिनीने रचलेल्या संगीतापैकी सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं संगीत म्हणजे त्याने व्हायोलिनसाठी रचलेले 24 कप्रिसस. हे संगीत व्हायोलिन वादनातली वेगवेगळी तंत्रं आत्मसात करण्यासाठी रचलं गेलेलं आहे. या रचना नीट वाजवण्याचा सराव केला तर व्हायोलिन वादनातलं प्रभुत्व आपोआपच येतं असं मानलं जातं. व्हायोलिन वाजवण्याची नवनवीन तंत्रं असणाऱया या रचना इतक्या ाढांतिकारक होत्या की, त्या ऐकून वेगवेगळ्या संगीतकारांनी वेगवेगळ्या वाद्यांसाठी नवीन तंत्रं शोधायला सुरुवात केली. पॅगनिनीने या संगीत रचना 1802 ते 1817 या काळात केल्या. त्याने या रचना पहिल्यांदा सहा, नंतर सहा आणि शेवटी बारा अशा तीन टप्प्यांमध्ये केल्या. या रचना 1820 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाल्या.

व्हायोलिनवर प्रभुत्व मिळवण्याची इच्छा असणारी मंडळी आजही पॅगनिनीच्या कप्रिससच्या रचनांचा सराव करताना दिसतात. व्हायोलिनवर उच्च पातळीचं प्रभुत्व असणारे वादक आजही मैफलींमध्ये या रचना सादर करताना दिसतात. व्हायोलिन वादनाच्या स्पर्धांमध्ये स्पर्धक लोक आपलं व्हायोलिनवरचं कौशल्य सादर करताना याच रचनांची निवड करताना दिसतात.
पॅगनिनीच्या कप्रिससनी पुढच्या काळात बरेच संगीतकार प्रभावित झाले. लीस्ट, शुमन आणि ब्राम्झ यांसारख्या संगीतकारांच्या पियानोसाठी केलेल्या काही रचनांवर पॅगनिनीच्या कप्रिससचा प्रभाव दिसून येतो.
1940 मध्ये पॅगनिनीच्या मृत्यूला शंभर वर्षे झाली. यानिमित्ताने पॅगनिनीच्या 24 कप्रिससचं पहिल्यांदाच रेकॉर्डिंग झालं. याप्रसंगी पॅगनिनीने रचलेल्या व्हायोलिनवर वाजवायच्या कप्रिससला पियानोची साथ असणाऱया संगीताची व्हर्जन निवडण्यात आली होती.
दोनशे वर्षं होऊनही पॅगनिनीच्या 24 कप्रिससच्या संगीताची जादू का कायम असावी हे पाहण्यासाठी आपण यूटय़ूबवर या रचनांपैकी झ्agaहग्हग् म्aज्rग्म 24चं संगीत एकदा तरी ऐकायलाच हवं ! 24 कप्रिससच्या रचनांपैकी चोविसावी रचना विशेष लोकप्रिय आहे. यात एक थीम मूळ रूपात आणि नंतर नवनवीन रूपांमध्ये येते.