Lok Sabha Election 2024 : ”तुम्हाला संपवायचे आहे”… एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

जळगावमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडसे यांच्या घरी हा धमकीचा फोन आला होता. धमकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखव केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गॅंगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खडसे यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तक्रारीनुसार, एकनाथ खडसे यांना 15 आणि 16 एप्रिल रोजी मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण गंभीर वाटत नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांना आतापर्यंत चार ते पाचवेळा धमकीचे फोन आले आहेत. खडसेंना वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला जीवे मारणार आहेत, अशी धमकी अज्ञाताने फोनवरून दिली. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेश येथून आले होते. आता त्यादिशेने पोलीस तपास करत आहेत.