मिंधे सरकारकडून जरांगे पाटील यांची फसवणूक

मराठा आरक्षणासाठी जालन्यात आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची मिंधे सरकारकडून फसवाफसवी सुरू आहे. एका मंत्र्याने जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे सरकार जीआर काढेल आणि तो उद्याच घेऊन येतो असे आश्वासन दिले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी वेगळेच जाहीर केले. जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे कुणबी दाखले देण्यास अजून वेळ लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे बनवलेला मसुदा दाखवला. जरांगे यांनी त्यात काही दुरुस्ती सुचवली. त्यानंतर खोतकर आज मुंबईसाठी रवाना झाले आहेत. याबाबत उद्या जीआर काढला जाईल. त्यानंतर जीआर घेऊन आपण उपोषणस्थळी येऊ, असे खोतकर म्हणाले, पण त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली.

कुणबी समाजाच्या दाखल्यासंदर्भात चर्चा झाली असून महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव त्यावर काम करत आहेत. जरांगे पाटील यांच्या जुन्या नोंदी असल्याने त्यांना दाखले मिळायला अडचणी येत आहेत. जुन्या नोंदी तपासायला वेळ लागेल. आम्ही समिती तयारी केली आहे. त्या समितीकडून अहवाल मागवला आहे. त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर आम्ही युद्धपातळीवर काम करतोय, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.